बुलडाणा : दरवाढीमुळे सर्वांचे लक्ष सध्या पेट्रोल व डिझेलकडे लागले आहे. आता पेट्रोल, डिझेलचा थेंब अन् थेंब किंमतीचा झाला आहे. पेट्रोल पंपांवर पेट्राेल, डिझेल टाकताना मापात पाप करणाऱ्यांवर वैधमापन शास्त्र यंत्रणेची करडी नजर आहे. वर्षभरात वैधमापनशास्त्र विभागाकडून जिल्ह्यातील ६४४ पेट्रोल पंपांची पडताळणी केली आहे. १५ मार्चला असलेल्या ‘जागतिक ग्राहक दिना’च्या अनुषंगाने जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील उलाढाल आणि ग्राहकांचे समज गैरसमज जाणून घेतले. दरम्यान, पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ग्राहक आजही जागरूक नसल्याचे दिसून आले. गेल्या महिन्याभरात पेट्रोलचे दर शंभरीवर आले आहेत तर डिझेलचे दरही ८८ रुपयांवर येऊन ठेपले आहे. या वाढत्या दरांमुळे ग्राहकाचे इंधनाच्या प्रत्येक थेंबाकडे आता लक्ष आहे. त्यात मापात पाप करणाऱ्यांची येथे कमी नाही. एवढे पैसे मोजून आपली फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येक ग्राहक जागरूक होणे गरजेचे आहे. त्याकरिता वैधमापन शास्त्र यंत्रणेने पडताळणीचे पाऊल उचलेले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात जवळपास ६४४ पेट्रोल पंपांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये नोझलची तपासणी करण्यात आली आहे. ग्राहकांची जागरूक होण्याचे आवाहन वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
पेट्रोल, डिझेल टाकताना घ्यावयाची दक्षता
१) पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल खरेदी करताना प्रथम ००० यावर रिडिंग आहे, की नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी डिस्पेन्सिंग युनिटवर इन्शुअर ओ बीफोर डिलीव्हरी अशी सूचना दिलेली असते.
२) दुचाकीमध्ये पेट्रोलसोबत घेताना हातचलाखी करत नाही, याची खात्री करावी तसेच प्रमाणित मापानेच घ्यावे. ३) पेट्रोल किंवा डिझेल घेताना जागरूक रहा व इतरत्र लक्ष विचलित होऊ देऊ नका.
४) डिलीव्हरीबाबत शंका असल्यास पेट्रोल पंपावर पाच लिटरचे प्रमाणित माप उपलब्ध असते.
प्रत्येक ग्राहकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. पथकाच्या तपासणीमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्यात येते. जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची पडताळणी करण्यात आलेली आहे. पेट्रोल पंपावर पाच लिटरचे प्रमाणित माप असते, त्याचाही ग्राहकांनी शंका असल्यास उपयोग करावा.
नि. रा. कांबळे, सहाय्यक नियंत्रक, वैधमापनशास्त्र बुलडाणा.
वर्षभरातील कार्यवाही
८६१६०००
वैधमापनशास्त्र विभागाकडे पडताळणी शुल्क जमा
१०५
वेब्रीज संख्या (१० टनावरील मोठे वजनकाटे तपासणी)
६४४
पेट्रोलपंप नोझल तपासणी