योगेश फरपट । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव(बुलडाणा) : गोरगरीब रुग्णांना गुणवत्तापूर्वक सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा दावा करीत असले, तरी शासकीय रुग्णालयातच काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांच्या स्वार्थीपणामुळे रुग्णसेवेवर परिणाम झालेला दिसून येतो. राज्य शासनामार्फत एनपीए म्हणजेच नॉन प्रॅक्टिशनर अलाउन्स घेतला जात असतानाही दुसरीकडे अनेक वर्ग-१ व वर्ग-२ दर्जाच्या वैद्यकीय अधिका-यांनी मोठमोठी दवाखाने थाटली असून, खासगी प्रॅक्टिस सुरू केली असल्याने त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य सेवेवर झाला आहे. शासकीय सेवेत एकदा प्रवेश केल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांना दुस-या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही, अशी स्पष्ट ताकीद असते. तसे प्रतिज्ञापत्रसुद्धा डॉक्टरांकडून करून घेतल्या जाते. मात्र या बाबी केवळ कागदावरच उरल्या आहेत. खामगाव उपजिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयासह नांदुरा, जळगाव, चिखली, शेगाव, मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या ९८ वैद्यकीय अधिकाºयांपैकी निम्याहून अधिक डॉक्टरांनी आपल्या कार्यक्षेत्रातच दवाखाने थाटली असून, प्रशासनाच्या नाकावर टिचून खासगी व्यवसाय सुरू केला आहे. शासकीय रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांकडून दवाखान्यातील पळवापळवी बरेचदा केली जाते; मात्र सरकारी रुग्णालयापेक्षा खासगीत का होईना; पण उपचार मिळेल, या आशेने रुग्णही बळी पडताना दिसतात. पगार शासनाचा घ्यायचा व सरकारी रुग्णालयात भरती रुग्णावर अर्थकारणापोटी आपल्या खासगीत उपचार करायचा, असा प्रकार उघडपणे सुरू आहे. या प्रकाराबाबत तक्रारीही झाल्यात. त्याची कोणतीही दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतल्या गेली नसल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराची दखल घेऊन संबंधित डॉक्टरांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे, अन्यथा एखादे दिवशी शासकीय रुग्णालयात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रुग्णांचा जीव मुठीत सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांना डॉक्टरांअभावी आपला जीव मुठीत घेऊन बसण्याची वेळ आली आहे. ‘ओपीडी’ची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० असल्यानंतरही अनेक ठिकाणच्या वैद्यकीय अधीक्षकांसह वैद्यकीय अधिकारी ड्युटीवर हजर राहत नसल्याचे वास्तव लोकमत चमूच्या निदर्शनास आले.
‘एनपीए’ घेणाºया डॉक्टरांना खासगी सेवा देता येत नाही किंवा स्वत:चे रुग्णालयसुद्धा थाटता येत नाही. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- डॉ. पी. बी. पंडित, जिल्हा शल्यचिकित्सक.
२२ पैकी १६ डॉक्टर करतात खासगी प्रॅक्टिस एनपीए (नॉन प्रॅक्टिशनर अलाउन्स) घेऊनही खामगाव उपजिल्हा रुग्णालयातील २२ पैकी १६ डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत आहेत. एवढेच नाही, तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.बी. वानखडे हे स्वत: नांदुरा येथे खासगी प्रॅक्टिस करण्यात व्यस्त असतात. साहेबच खासगी प्रॅक्टिस करीत असल्याने इतर डॉक्टरांचे तर आपोआपच फावते.