हनुमान जगताप। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: मलकापूर ते अकोला दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दर पंधरा मिनिटाला होणारा चक्काजाम असंख्य वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात अपघातातही खूप वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याच्या कामासाठी किती बळी घेणार, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. धुळे ते अमरावतीदरम्यान सुरुवात झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची प्रक्रिया आता मलकापूर ते अकोलादरम्यान सद्यास्थितीत सुरू आहे. भूसंपादनानंतर प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा लाभ देताना वेगवेगळ्या मुद्यांवरून महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया वारंवार चर्चेत राहिली आहे. त्यासाठी रस्त्यालगतच्या कापण्यात आलेल्या झाडांमुळे पर्यावरण संतुलनाचा प्रश्नही ऐरणीवर झाला.मागील दहा ते बारा वर्षात आता कुठे महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती आहे; मात्र त्यातही रस्त्याच काम निश्चित कालवधीत होईल किंवा नाही, असा प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकीकडे महामार्गाची प्रक्रिया थंड बस्त्यात पडल्याची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे रस्त्यात खड्डे की खड्डय़ात, रस्ता अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्डेच खड्डे रस्त्यावर पडल्याने महामार्गावर मलकापूर ते नांदुरादरम्यान मौजे वाघुड, बेलाड, वडनेर भोलजी आदीसह विविध ठिकाणी दर पंधरा मिनिटाला चक्का जाम होत आहे. परिणामी सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था असंख्य लहान-मोठय़ा वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पर्यायाने रस्त्यालगत वसलेल्या गावांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे. महामार्गावर मोठय़ा जड वाहनांच्या दिमतीला लहान वाहनांची प्रामुख्याने मोटारसायकलींची ही भाऊगर्दी असते. त्यामुळे चिकार वाहतुकीचा रस्ता अशी महामार्गाची ओळख आहे. अशात खड्डा चुकवण्याचा प्रयत्न वाहनधारकांचा असतो. त्यामुळेच असंख्य अपघात मलकापूर व नांदुरादरम्यान झाल्याची नोंद पोलिसात आहे. अनेकांना जीव गमवावा लागला असून, जखमींची संख्या तर लक्षवेधी ठरावी अशीच आहे.दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संवाद साधला असता, चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जाते. मलकापूर ते नांदुरादरम्यान प्रत्यक्ष पाहणीत तसे दिसत नाही. उलटपक्षी अपघातात वाढच होत चालली, त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी प्रशासन किती बळी घेणार, हा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा !महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम थंड बस्त्यात आहे. परिणामी वाहनधारकांची डोकेदुखी वाढलीय. वाढत्या अपघातात अनेक जीव गेल्याने महामार्ग कर्दनकाळ ठरू पाहत असल्याने लोकप्रतिनिधींनी या विषयावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा, असा सूर उमटत आहे.
चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. काम लवकरात लवकर व्हावे यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. येत्या मार्च अखेरीस बर्यापैकी काम पूर्ण झालेले असेल. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. त्यात यश येईल, असा विश्वास आहे.-व्ही.पी. ब्राह्मणकरप्रकल्प अधिकरी, राष्ट्रीय महामार्ग ६