ऑक्सिजन व रेमडेसिविरचा पुरवठा व वापराचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:31 AM2021-04-14T04:31:25+5:302021-04-14T04:31:25+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात कोविड संसर्गाची वाढती व्याप्ती व सक्रिय रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता अन्न व औषध प्रशासन ...

Properly plan the supply and use of oxygen and remedies | ऑक्सिजन व रेमडेसिविरचा पुरवठा व वापराचे योग्य नियोजन करा

ऑक्सिजन व रेमडेसिविरचा पुरवठा व वापराचे योग्य नियोजन करा

googlenewsNext

बुलडाणा : जिल्ह्यात कोविड संसर्गाची वाढती व्याप्ती व सक्रिय रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संसर्ग नियंत्रण समितीची आढावा बैठक घेतली. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा व वापर योग्य पद्धतीने होईल याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने समन्वय ठेवून जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी सांगितले. सोबतच शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण होता कामा नये. डायलिसिसवरील रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यास त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, तसेच त्याचे नियमित डायलिसिस करण्यात यावे. रेमडेसिविरचा जास्त वापर झाल्यास रुग्णांना साइड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे अतिआवश्यक असल्यासच त्याचा वापर करावा. जी खाजगी रुग्णालये कोविडवरील उपचार करीत आहेत, त्यांनी परवानगी घेतली आहे किंवा नाही, हे तपासून पाहावे. त्यांना नियमानुसार परवानगी द्यावी, तसेच खाजगी रुग्णालये रुग्णांकडून अवाजवी रक्कम घेत तर नाही ना, याबाबतही तपासणी करावी, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. शिंगणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सहाही उपविभागीय स्तरावर एक कोविड रुग्णालय तयार करता येईल का, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चाचपणी करावी, तसेच सिंदखेड राजा येथील शासकीय रक्तपेढी लवकरात लवकर सुरू करावी, असेही स्पष्ट केले. रविवारी घेतलेल्या या आढावा बैठकीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट, मृत्यूदर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सिजनचा साठा व पुरवठा याची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली.

Web Title: Properly plan the supply and use of oxygen and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.