बेहिशेबी युरीया वाटप प्रकरणी कृषी केंद्र चालकावर कारवाई प्रस्तावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 04:32 PM2020-08-08T16:32:15+5:302020-08-08T16:32:28+5:30
जिल्ह्यातील १३० युरिया विक्रेत्यांच्या दुकानाचीही तपासणी करण्यात आली आहे.
बुलडाणा: बेहिशेबी युरीया वाटप प्रकरणी शेंबा येथील कृषी केंद्र चालकावर कारवाई प्रस्तावीत करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात जवळपास एक हजार १४० शेतकºयांना वाटप करण्यात आलेल्या युरीयाचीही कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली आहे.
नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील एका कृषी केंद्रावर चार शेतकºयांना अवाजवी स्वरुपात एक हजार २८ गोण्या युरीयाचे खत वाटप करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. प्रकरणी कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात नांदुरा व मोताळा तालुक्यातील शेतकºयांची प्रत्यक्ष चौकशी करून वाटप करण्यात आलेल्या खताच्या पावत्यांचा मेळही तपासण्यात आला. त्यात पावत्यांनुसार खत योग्य पद्धतीने वाटप करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या काळात पॉस मशिनवर शेतकºयांचे थंब न घेण्याच्या सुचना होत्या. त्यामुळे कृषी केंद्र चालकाने मोजक्याच शेतकºयांच्या नाववर युरीया घेतल्याचे दाखवले. त्यातून हा सर्व घोळ झाल्याचे तपासात समोर आले असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान युरीया खताच्या वाटपाच्या नोंदी संगणकावर घेण्यात आल्या असल्याचे समोर आले. या नोंदी करताना कृषी केंद्र चालकाने शॉर्टकट वापरल्याचे तपासात समोर आल्याचे कृषी विभागातील अधिकाºयाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे एक मे २०२० पासून वाटप झालेल्या युरीया खताची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, युरीया खत वाटपाच्या योग्य नोंदी न ठेवता त्यात शॉर्टकट वापरल्याप्रकरणी शेंबा येथील कृषी केंद्र चालकावर आता कारवाई प्रस्तावीत करण्यात आली असल्याची माहिती कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, या प्रकरणात कृषी विभागाकडून जिल्ह्यातील १३० युरिया विक्रेत्यांच्या दुकानाचीही तपासणी करण्यात आली आहे.