खामगाव: ग्रेड पे तात्काळ लागू करावे, या प्रमुख मागणीसह तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार असोसिएशनच्यावतीने सोमवारी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, ग्रेड पे संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांची मंजुरी मिळाल्यानंतर देखील शासनाने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शासनाच्या या धोरणामुळे कर्मचार्यांमध्ये साशंकता निर्माण झाली असून राज्य शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा तहसीलदार आणि नायब तहसीलदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सदाशिव शेलार, तहसीलदार रूपेश खंडारे, माया माने, प्रिया सुळे संजिवनी मुपडे, अनंता पाटिल, सुनिल आहेर, अमरसिंग पवार, डी. एम डब्बे, सुरेश कावळे, पी.के करे, विजय हिवाळे, श्याम भांबळे, व्ही. यू पाटील, अभिजीत जोशी, विद्या गोरे, एच.डी. विर, एम सी गायकवाड आदींच्या स्वाक्षरी आहेत.