नाभिक समाजाचे तहसीलदारांना निवेदन
मेहकर : सततच्या लाॅकडाऊनमुळे सलून व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत़ त्यामुळे प्रत्येक सलून व्यावसायिकाला मासिक २० हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी नाभिक समाजाचे दत्ताभाऊ मोतेकर व इतरांनी सोमवारी मेहकर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे़, अन्यथा सलून व्यवसाय बंदचे आदेश मागे घेण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे़
शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करणे या उद्देशाने सलून व पार्लर व्यवसाय ०५ एप्रिल पासून ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सन २०२० वर्षीच्या कोरोनाविषयीच्या शासनाच्या निर्णयांचा आदर ठेवत सलून व्यावसायिकांनी सर्व नियम व आदेश पाळून सन्मान राखला. मागील लॉकडाऊनमध्ये सलून व पार्लर व्यावसायिक कसातरी सावरला होता, परंतु आताच्या या लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिक संकटात सापडणार आहे़ मागील लॉकडाऊनमध्ये किमान १८ ते २० आत्महत्या झाल्या आहेत. त्यांना अजूनही शासनाने कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. तरी आत्महत्या करणाऱ्यांना पाच लाख रुपये प्रति कुटुंब आर्थिक साहाय्य देण्यात यावे, शासनाने सलून व पार्लर व्यवसाय बंद करण्याआधी कर्नाटक, गुजरात सरकारच्या धर्तीवर सलून व्यावसायिकांना प्रत्येकी मासिक अनुदान द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ यावेळी गणेश डायरे, एकनाथ राऊत, गजानन मोतेकर, समाधान रावे, विजय चवरे, विष्णू जाधव, नारायण चिखलकर व
कृष्णा चवरे उपस्थित होते.