बुलडाणा जिल्ह्यातील माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 11:32 AM2021-07-01T11:32:43+5:302021-07-01T11:32:54+5:30

Buldhana News : जलसंधारणाच्या ८६९ स्ट्रक्चरपैकी तब्बल १८८ स्ट्रक्चरची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. 

The question of safety of lakes is on the agenda in Buldhana District | बुलडाणा जिल्ह्यातील माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बुलडाणा जिल्ह्यातील माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Next

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : चिखली तालुक्यातील आमखेड येथील माती तलाव फुटल्यामुळे चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यातील लगतच्या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत असलेल्या जलसंधारणाच्या ८६९ स्ट्रक्चरपैकी तब्बल १८८ स्ट्रक्चरची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. 
आमखेड येथील दुर्घटनेनंतर यासंदर्भात माहिती घेतली असता, जलसंधारण विभागाकडे (लोकल सेक्टर) १७ फेब्रुवारी २०२१ च्या राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ही दुरुस्तीची कामे सोपविण्यात आली होती. मात्र अद्यापही या कामांना मुहूर्त निघालेला नाही. पावसाळ्यामुळे आता ही कामे दिवाळीनंतरच होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. दुसरीकडे या १८८ स्ट्रक्चरपैकी ६२ स्ट्रक्चरची कामे करण्यास पूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु त्यासंदर्भातील निविदा झालेल्या नव्हत्या. आता या दुर्घटनेनंतर सुमारे आठ कोटी ५० लाख रुपयांच्या या कामांच्या निविदा काढण्यात येत असल्याचे जलसंधारण विभागाचे अधिकारी राजू झोरावत यांनी सांगितले. दरम्यान, आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही ते म्हणाले.  दुर्घटनेनंतर आता निविदा प्रक्रियेचे सोपस्कार होत असले तरी कामासाठी दिवाळीच उजाडणार आहे.

जि.प. सिंचन विभागाचा डोलारा मोठा
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे ७५ सिंचन तलाव, ३४५ पाझर तलाव, १९८ गाव तलाव आणि २०१ कोल्हापुरी बंधाऱ्याचे व्यवस्थापन आहे. या माध्यमातून १९ हजार ५०० हेक्टरच्या आसपास या विभागाची महत्तम सिंचन क्षमता आहे. मात्र बहुतांश स्ट्रक्चर हे जुने झालेले आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचीही गरज निर्माण झालेली आहे.


६२ कामे हस्तांतरीत
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडील ६२ कामे आमच्याकडे हस्तांतरित झालेली आहेत. या कामांची निविदा सध्या काढण्यात येत आहे. आमखेड येथील फुटलेला माती तलावाचा या कामामध्ये समावेश नसल्याचे जलसंधारण अधिकारी वैभव शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.


आमखेडचा माती तलाव जुनाच

जिल्हा परिषदेंतर्गतचा आमखेडचा माती तलाव हा १९८० च्या दशकातला आहे. तो २८ जूनरोजी झालेल्या दमदार पावसादरम्यान फुटल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले. परिसरातील अेाढ्यांनाही या काळात पूर आल्याने हे पाणी नदी-नाल्यात सामावू शकले नाही व शेतीमध्ये ते घुसल्याने मोठे नुकसान झाले. दुसरीकडे आमखेडनजीकच असलेला अंबाशी येथील तलाव मात्र सुरक्षित असल्याचे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे अभियंता पवन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणी केली आहे.

Web Title: The question of safety of lakes is on the agenda in Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.