बुलढाणा - कोट्यवधी रुपयांच्या कर चुकवेगिरीप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या खामगावातील एका व्यापाऱ्याच्या उद्याेग व घरावर मुंबई येथील वस्तू व सेवा कर विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. ७) रात्री छापा टाकला. या कारवाईमुळे खामगावात एकच खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
खामगाव येथील सजनपुरी येथे दुर्गाशक्ती फूड्सचे संचालक शशिकांत सुरेका यांनी काेट्यवधी रुपयांची कर चुकवेगिरी केल्याचे वस्तू व सेवा कर विभागाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी खामगाव येथील जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सी. के. राजपूत यांच्या तक्रारीवरून १० नोव्हेंबर २०२१ रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दाेषाराेपपत्र न्यायालयात सादर असतानाच वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई येथील पथकाने शुक्रवारी सायंकाळी दुर्गाशक्ती फूड्स येथे छापा टाकला. दरम्यान, वीजपुरवठा खंडित करून अंधार करण्यात आल्यामुळे वस्तू व सेवा कर विभागाने खामगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले.
मुंबई येथील एका मोठ्या महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात येत आहे. पथकात जीएसटी इन्स्पेक्टर आणि १५ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. संबंधित व्यापाऱ्याकडे कोट्यवधींचा कर थकीत असल्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये खामगाव जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त डाॅ. चेतनसिंग राजपूत यांनी व्यापाऱ्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.
कर चुकवेगिरीचे मोठे घबाड समोर आल्याने मुंबई येथील पथकाने सुरुवातीला नागपूर येथे धडक दिली. तेथील जीएसटी कार्यालयातून वॉरंट घेऊन हे पथक खामगावात धडकले. त्यानंतर दुर्गाशक्ती फूड्सच्या विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. माझगाव येथील गुन्हे अन्वेशन शाखेचे पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.