पावसाची दडी; बोगस बियाणे कंपन्यांच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:16 AM2020-06-27T11:16:03+5:302020-06-27T11:16:12+5:30
कंपन्यांच्यावतीने बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येते. मात्र, यावर्षी पावसाने दडी दिली आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतकऱ्यांनी शेतामध्ये विविध पिकांच्या बियाण्यांची पेरणी केली. त्यांपैकी अनेकांचे बियाणे उगवलेच नाहीत. विविध कंपन्यांच्यावतीने बोगस बियाण्यांची विक्री करण्यात येते. मात्र, यावर्षी पावसाने दडी दिली आहे. परिणामी बियाणे न उगवण्याचे दुसरे कारण समोर आल्यामुळे पावसाची दडी बियाणे कंपन्यांच्या पथ्यावर पडली आहे.
सध्या बहुतांश तालुक्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. मात्र, बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी कृषि विभागाकडे येत आहेत. गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. पावसाने दडी दिल्यामुळे सुद्धा बियाणे उगवत नाहीत. सध्या शेतात असलेल्या बियाण्यांना बुरशी लागली आहे. त्यामुळे बियाणे उगवण्याची शक्यता कमी आहे. बियाणे बोगस असल्यामुळे उगवले नाहीत की पावसामुळे असा संभ्रम कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. बियाण्यांची उगवणक्षमता ६५ टक्के असणे आवश्यक असते. मात्र, नियमांचे उल्लंघन करीत अनेक कंपन्या बोगस बियाणे बनवितात. यावर्षी सुद्धा अशा कंपन्यांनी बियाण्यांची विक्री करण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे कृषि विभागाने शेतकºयांना घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. कोरोनाच्या काळात सभा व कार्यक्रम घेणे शक्य नसल्यामुळे वाहनांवर लाऊडस्पीकर लावून उगवण क्षमता कशी तपासावी, याबाबत मार्गदर्शन केले होते. कृषि विभागाच्या आवाहनानुसार शेतकºयांनी घरगुती बियाण्यांची पेरणी केली. मात्र, उगवण क्षमता तपासण्यात घोळ झाल्यामुळे अनेक शेतकºयांचे घरगुती बियाणेही उगवले नाहीत.
बियाण्यांचा नमुना ठेवणे आवश्यक
बियाणे विकत आणल्यावर पेरणी करीत असताना बियाण्यांचे काही नमुने ठेवणे आवश्यक आहे. सोयाबिनचे बियाणे कमीतकमी २५० ग्रॅम पेरणी न करता ठेवायला हवे. अन्य पिकांचे त्यापेक्षा कमी ठेवावे. पेरणी केल्यानंतर या नमुन्यांची तपासणी करून बियाणे योग्य आहे की नाही, याचा शोध घेणे शक्य होते.
गतवर्षी सोयाबिन सोंगणीच्यावेळी पाऊस आला होता. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सोयाबिन बियाण्यांमध्ये दोष आहे. त्यामुळेच तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकºयांनी घरच्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करायला हवी. विकतचे बियाणे घेताना सुद्धा ते शासनमान्य आहेत की नाही, बियाण्यांची उगवणक्षमता ७० टक्के आहे की नाही? हे तपासावे.
- डॉ. आम्रपाली आखरे, संशोधक,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला.