पर्जन्यधारांचा वर्षाव सुरूच!
By admin | Published: August 4, 2016 01:11 AM2016-08-04T01:11:49+5:302016-08-04T01:11:49+5:30
हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात : मलकापूर तालुक्यात सर्वात जास्त ३२ मि.मी. पावसाची नोंद.
बुलडाणा, दि.३: जिल्ह्यात पावसाने ठाण मांडले असून, गत दोन दिवसांपासून पर्जन्यधारांचा वर्षाव सुरूच आहे. कधी रिमझिम, तर कधी दमदार पर्जन्यवृष्टीचा अनुभव जिल्हावासीयांनी घेतला. सुरुवातीपासूनच समाधानकारक बरसणार्या पावसाने बुधवारीही आवर्जून उपस्थिती लावली. जिल्ह्यात ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपयर्ंत सर्वात जास्त ३२ मि.मी. पावसाची नोंद मलकापूर तालुक्यात करण्यात आली आहे. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.
गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. जोरदार आलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर बुधवारी पाणी वाहत होते. तसेच ठिकठिकाणी डबके साचले आहेत. यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला होता. नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात मंगळवारी सर्वात जास्त पाऊस मलकापूर तालुक्यात ३२ मि.मी (५0७ मि.मी), शेगाव : २0 (४६४), सिंदखेड राजा: १८.६ (८६0.४), बुलडाणा: १६ (४६१), खामगाव : ११.२ (५२0.२), नांदुरा : १0(५४३.८), संग्रामपूर : ७ (४0८), दे.राजा : ६ (५७७), जळगाव जामोद : ५ (५४४), मोताळा: ४ (४१९), चिखली ४, मेहकर: ३ (५६६), लोणार : ३ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १३९.८ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून, सरासरी १0.८ मि.मी आहे. आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस सिंदखेड राजा तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे.