बियाण्यांचे दर कमी करा, अन्यथा विक्री करू देणार नाही
By Admin | Published: May 3, 2015 02:08 AM2015-05-03T02:08:30+5:302015-05-03T02:08:30+5:30
कृषीमंत्री एकनाथ खडसे यांचा इशारा; कपाशी बियाण्यांच्या पाकिटावरील एमआरपी कमी करण्याचेही निर्देश.
बुलडाणा : गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी खचला आहे. त्यामुळे बीटी कापूस बियाणे कंपन्यांना दर कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या कंपन्या दर कमी करणार नाहीत, त्यांना राज्याच्या कोणत्याही कोपर्यात बियाण्यांची विक्री करू देणार नाही, असा सज्जड दम राज्याचे महसूल तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे दिला.
गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी देशोधडीला लागला असतानाच, बियाणे कंपन्यांनी बियाणांच्या भावात प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी कसरत करावी लागते.
सर्वसामान्य शेतकर्यांना परवडेल अशा भावात बीटी बियाण्यांची विक्री करण्याचे निर्देश संबंधित कंपन्यांना दिले आहेत. भाव नियंत्रित करण्यासाठी नकार देणार्या कंपन्यांना आपण राज्यात कापूस बियाणे विकू देणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
खरीप हंगाम नियोजन सभा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. त्यावेळी नियोजनासंदर्भा त सूचना करताना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्ष अलकाताई खंडारे, आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, चैनसुख संचेती, राहुल बोंद्रे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, विभागीय कृषी सहसंचालक सु.रा सरदार, अ ितरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे, जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सभापती सुलोचनाताई पाटील आदी उपस्थित होते.
*बोगस बियाणे देणार्यावर फौजदारी कारवाई
बोगस बियाणे असल्याचे व बियाण्यांमध्ये उगवणशक्ती नसल्याचे सिद्ध झाल्यास अशा बियाणे उत्पादकांवर फौजदारी गुन्हे दाखल केल्या जाणार आहे. संबंधित शेतकर्याने जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर त्याला पुराव्याची गरज पडणार नाही. उत्पादकाला निर्दोष असल्याचे सिद्ध करावे लागेल, अशी तरतूद असणारा नवीन कायदा सरकार लवकरच आणणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्नी एकनाथराव खडसे यांनी आज केले.