वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
साखरखेर्डा : परिसरात गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात वृक्षताेड करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान हाेण्याची भीती आहे. अनेकजण झाडांच्या बुंध्याला आग लावून दुसऱ्यादिवशी त्याची विल्हेवाट लावत असल्याचे चित्र आहे.
साखळी-अंत्री तेली शेतरस्त्याचे काम मार्गी
बुलडाणा : साखळी ते अंत्री तेली शेतरस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या भागात शेती असलेले शेतकरी त्रस्त झाले आहेत. या शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली हाेती.
रस्त्यावरील धुळीमुळे पिकांना फटका
दुसरबीड : तढेगाव फाटा ते देऊळगावमही रोडवरील समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. सध्या शेतात कांदा, टरबूज, खरबूज पिके आहेत. धुळीमुळे या पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे.
राहेरी बु परिसरात ग्रामस्थांची सरपणाकडे धाव
राहेरी बु : स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सतत वाढत आहे. महिन्याभरात घरगुती सिलिंडरची किंमत ७२० रुपयांनी वाढून ८७० रुपयांवर पोहोचली असताना, सबसिडी मात्र केवळ दाेन रुपये एवढीच दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सिलिंडर परवडत नसल्याने ते सरपणासाठी जंगलाकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने सुरू
डोणगाव : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गंत कडक निर्बंध लावले आहेत. जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, राष्टीय महामार्गावर असलेल्या डाेणगाव येथे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तही अन्य दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याने संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
उगले पांग्री रस्त्याची दुरुस्ती करा
किनगाव राजा : येथील महात्मा फुलेनगराकडे जाणाऱ्या उगले पांग्री रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
बुलडाणा : मार्च महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात आले आहेत़ मात्र, अजूनही मदत मिळालेली नाही़
ग्रामीण भागात व्यवसाय लाॅकडाऊन
धामणगाव धाड : कोरोनाच्या सावटामुळे ग्रामीण भागात हातावर पोट भरणाऱ्या लहान व्यावसायिकांचे गेल्या काही दिवसांपासून खूप हाल हाेत आहेत. मंदीमुळे आर्थिक आवक कमी झाल्याने अनेकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता कठीण झाले आहे.
घरगुती उपचारामुळे मूळव्याधीचे रुग्ण वाढले
बुलडाणा : गरम पाण्याचा वापर आणि उष्ण औषध घेतले, तर कोरोना होत नाही, या समजुतीतून अनेकांनी गावठी औषध-काढ्यांचा वापर केला. गत एका वर्षात उन्हाळ्याच्या काळात चहा, गरम पाणी आणि उष्ण असलेला काढा वापरला. यामुळे कोरोना बरा झाला नाही उलट मूळव्याधीचा त्रास अधिक वाढला आहे.
शिक्षकांना बदलीसाठी ३० शाळांचा पर्याय
बुलडाणा : ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता एकाऐवजी चार जिल्ह्यांचा आता २० ऐवजी ३० शाळांचा पर्याय देता येणार आहे. त्यामुळे हा निर्णय शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे.
लोणार बसस्थानकात शुकशुकाट
लोणार : येथे जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात. मात्र सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने बसस्थानकात पूर्णपणे शुकशुकाट पसरला असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे नागरिकांची शेतीकडे धाव
डोणगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्याने व संसर्गाच्या भीतीने नागरिक शेतातच मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. शेतातील वातावरण प्रसन्न असते. या ठिकाणी संसर्गाचा धोका नसल्याने नागरिकांनी शेताकडे धाव घेतली आहे.