- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: बोगस, खत बियाण्यांची विक्री रोखावी, यासाठी कृषी विभागाच्या १४ पथकांकडून जिल्ह्यातील कृषी केंद्राच्या तपासणीची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५५० कृषी केंद्राची तपासणी करून २४३ खत, बियाण्यांचे नमुने औरंगाबाद व नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्यातील खतांच्या १९ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ९ खतांचे नमुने फेल ठरले आहेत; मात्र खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाही बियाण्यांचा अहवाल नागपूरातील प्रयोगशाळेतच अडकलेला आहे.खरीप हंगामात यंदा जिल्ह्यातील सुमारे ७ लाख ३८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होणार आहेत. त्यानुसार कृषी विभागाकडून खते व बी-बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १ लाख ३९ हजार ४० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली असून महाबीज मार्फत ४२ हजार ८०० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यास या खते व बियाण्यांचा पुरवठा सुरू झाला आहे. कृषी सेवा केंद्रात खते, बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी येत आहेत. या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचीही शक्यता आहे. याआधी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तर काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे न उगवल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यामुळे बोगस बियाण्यांपासून शेतकºयांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. खरीप हंगामाआधीच कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. कृषी निविष्ठांच्या प्रभावी गुणनियंत्रणासाठी कार्यन्वीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय दक्षता पथक व तालुकास्तरीय दक्षता पथक अशा एकूण १४ पथकामध्ये ६९ अधिकाºयांचा समावेश आहे. या पथकांनी आतापर्यंत ५५० कृषी केंद्रांची तपासणी केली आहे. त्यातील ८७ खतांचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर १५६ बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये बियाण्यांच्या गुणवत्तेचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झाला नाही. खरीप हंगामासाठी लागणाºया खत बियाण्यांची खरेदी सुरू झाली असून अद्याप त्याच्या गुणवत्तेची तपासणी पूर्ण न झाल्याने शेतकºयांनी खरेदी केलेल्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)
पुढील आठवड्यामध्ये खत व बियाण्यांचा अहवाल औरंगाबाद व नागपूर येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त होईल. दरम्यान, शेतकºयांनी खत, बियाणे हे अधिकृत विक्रेत्याकडुनच खरेदी करावे. बियाण्याचे पक्के बिल घ्यावे, पाकिटावरील अंतीम मुदत पाहावी, बियाण्याची बॅग जपून ठेवावी, यासारखी खबरदारी शेतकºयांने घेणे आवश्यक आहे.-व्ही. टी. मुकाडे, कृषी केंद्र तपासणी मोहीम अधिकारी, बुलडाणा.