बुलडाणा जिल्ह्यात निर्बंधांची कठोरता वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 10:58 AM2021-05-09T10:58:43+5:302021-05-09T10:58:50+5:30
Buldhana News : ९ मे रोजी यासंदर्भात प्रसासन महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध सध्या लादले आहेत. दरम्यान, कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता निर्बंधांची कठोरता अर्थात तीव्रता आणखी वाढविण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिले असून, ९ मे रोजी यासंदर्भात प्रसासन महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची सूत्रांनी सांगितले. निर्बंधांची कठोरता यात वाढणार आहे. त्याचे नेमके स्वरूप कसे असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमरावती विभागात अकोला, वाशिम आणि अमरावती येथे असे कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती बुलडाणा जिल्ह्यात होऊ शकते. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ सूत्रानेही त्यास दुजोरा दिला आहे.
जिल्ह्यात मार्चमध्ये जिल्हास्तरावर काही निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतरही बुलडाणा जिल्ह्यात मार्च महिन्यात १९ हजार ७६ व्यक्ती बाधित आढळून आल्या होत्या, तर सक्रिय रुग्णांची संख्या ५,४९४ होती. ६७ मृत्यू झाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात २६ हजार १४५ कोरोनाबाधित आढळून आले. सक्रिय रुग्णांची संख्या ६,८७८ होती, तर १५० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यातही कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन निर्बंधांची कठोरता वाढविणार असल्याचे संकेत आहेत.