आर.ओ. घोटाळा: लेखा विभागाकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 02:51 PM2019-05-29T14:51:13+5:302019-05-29T14:51:20+5:30
खामगाव : आर.ओ.घोटाळा प्रकरणी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने चौकशी केली
- योगेश फरपट
लोकमत न्युज नेटवर्क
खामगाव : आर.ओ.घोटाळा प्रकरणी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने चौकशी केली. त्यात बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये आर.ओ. घोटाळा खरेदीमध्ये अनियमितता व घोळ झाल्याचे आढळून आल्याने ग्रामसेवकांसह गटविकास अधिकारी के.डी. शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार करून ग्रामसेवकांनी आर.ओ.प्लांट लावल्याचे दाखवले होते. खामगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून लाखो रुपये सुद्धा कपात झाले होते. मात्र आर.ओ. प्लांट लावण्यात न आल्याने खळबळ निर्माण झाली होती. लोकमतने ही बाब उघड केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरु झाली. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रेखा चंद्रशेखर महाले यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी काहीही कारवाई न केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात त्यांनी विभागिय आयुक्तांकडे दाद मागितली. विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. शण्मुखराजन यांना चौकशीचे निर्देश दिले. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरु झाली. त्यात १२ ग्रामपंचायतीमध्ये आर.ओ. घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. प्रशासनाने विस्तार अधिकारी राठोड यांना प्रथमदर्शनी दोषी ठरवत निलंबनाची कारवाई केली. तब्बल चार महिन्यानंतर २८ मेरोजी संध्याकाळी ५ वाजता जिल्हा परिषदेच्या लेखा समितीने पुन्हा चौकशी करीत कागदपत्रांची पडताऴणी केली.
१२ ग्रामसेवकांचे नोंदवले बयाण
चौकशी समितीने १२ ग्रामसेवकांचे बयाण नोंदवले आहेत. त्यात प्रत्यक्ष कागदपत्रे व लेखी बयाणात तफावत आढळून येत असल्याने ग्रामसेवक दोषी असल्याचे आढळून आले आहे. अनेक ग्रामसेवकांनी थातूरमातूर आर.ओ.प्लांट लावून शासनाची फसवणूक केली. सरपंचांनी आपल्या पदाचा दुरपयोग करीत राजकीय हस्तक्षेप वाढवला. त्यामुळे कारवाईस विलंब होत आहे.
बिडीओंवर कारवाईची टांगती तलवार
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीमध्ये गैरप्रकार झाला असतांनाही गटविकास अधिकारी के. डी. शिंदे यांनी प्रकाराकडे दुर्लक्ष केले. जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार करूनही तक्रारीवर कोणतीही अॅक्शन घेतली नाही. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जेव्हा चौकशी लावली तेव्हा त्यात ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह संबधित गावाचे सरपंच दोषी आढळले आहेत. आता याप्रकरणात संबधितांवर कोणती कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषद लेखा समितीने खामगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची चौकशी केली. आर.ओ. प्रकरणातील सर्व दस्तऐवज तपासले.
- सुमीत जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी, पं.स.खामगाव.
१४ व्या वित्त आयोगाचा पैसा गावात विकास कामे करण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. मात्र तालुक्यात काही ठिकाणी निधीचा दुरुपयोग झाला. या प्रकरणाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करेल. दोषींवर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे.
- रेखा चंद्रशेखर महाले, सदस्य, जिल्हा परिषद, बुलडाणा.