- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाहतुक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. ‘आरटीओ’ च्या जाळ्यात ५७९ वाहने गेल्या वर्षभरात अडकली आहेत. जप्त केलेल्या वाहनांपैकी ८३ टक्के वाहनांची मुक्तता करण्यात आली आहे. या वाहनधारकांकडून एक कोटी ६८ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीचे अनेक नियम आहेत. या नियमांचे काही वाहनधारकांकडून काटेकोरपणे पालन केल्या जात नाही. अशा वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून नजर ठेवली जाते. वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनधारकांविरूद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. कर न भरणे, अवैध प्रवासी वाहतुक, विमा नसणे तथा ओव्हरलोड वाहनधारकांना दंड ठोठावण्यात येतो. दंडाची रक्कम न भरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येतात. जप्त करण्यात आलेले वाहन त्या त्या कार्यक्षेत्रातील पोलिस स्टेशन किंवा एसटी डेपोमध्ये जमा करण्यात येते. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ५७९ वाहने जप्त करण्यात आली. यापैकी ४८६ वाहने मुक्त करण्यात आली आहेत. या वाहनधारकांकडून एक कोटी ६८ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी अद्याप मुक्त न झालेली ९३ वाहने आहेत. याआधीदेखील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जप्त करण्यात आलेली व मुक्त न झालेली बरीच वाहने आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हर्रासी न झाल्याने ही वाहने तशीच पडून आहेत. यामुळे पोलीस स्टेशन व एसटी डेपोमधील जागा नाहक अडकून पडत आहे. एवढेच नव्हे तर अनेक वाहने भंगारवस्थेत पडली असल्याचे दिसून येत आहे. भंगार वाहनांची संख्या वाढण्यापूर्वी या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी हर्रासी करणे अपेक्षित आहे.दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाहतुक नियम मोडणाºया वाहनधारकांना दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्या जाते. मुदतीत वाहने मुक्त न केल्यास ती वाहने पोलिस स्टेशन व एसटी डेपोच्या आवारात जमा ठेवण्यात येतात. या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी काही नियोजित कालावधीनंतर या सर्व वाहनांची हर्रासी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने अनेक वेळा हर्रासीला विलंब होत असल्याचे दिसून येते.दीड कोटींपेक्षा जास्त कराची वसुलीउपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या पथकाच्या वतीने २०१९ मध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कर न भरलेले अनेक वाहनधारक आढळून आले. रस्त्यावर पकडण्यात आलेल्या वाहनधारकांकडून १ कोटी ६५ लाख ६१ हजार रुपयांचा कर वसुल करण्यात आला. अद्यापही कर न भरलेल्यांनी प्राधान्यक्रमाने आपल्या वाहनांचा कर भरावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘आरटीओ’ च्या कारवाईत १.६८ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:51 AM