आरटीई: बुलडाणा जिल्ह्यात एक हजारावर प्रवेश पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 04:29 PM2019-05-05T16:29:32+5:302019-05-05T16:29:38+5:30
आतापर्यंत १ हजार १०८ विद्यार्थ्यांचे शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घेण्यात आले आहेत.
बुलडाणा: आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाहिल्या लॉटरीमध्ये जिल्ह्यातील १ हजार ६०९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती; त्यापैकी आतापर्यंत १ हजार १०८ विद्यार्थ्यांचे शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घेण्यात आले आहेत. दरम्यान, निवड झालेल्यांपैकी ४४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित असून ५२ अर्ज त्रुटीत अडकले आहेत.
आरटीई अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात २२० शाळांमध्ये २ हजार ९२९ जागांसाठी आरटीई प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आर्थिक दुर्बल व मागास घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला असून, या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश राखीव ठेवण्यात आले आहेत. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी ५ ते ३० मार्च या कालावधीत पालकांनी आॅनलाइन अर्ज केले. त्यानंतर ९ एप्रिल रोजी लॉटर पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ११ एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. यंदा कागदपत्रे पडताळणी समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीकडून खोटे पत्ते दिलेले प्रवेश गुगल मॅपिंगच्या आधाराने रद्द ठरविण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून मुकले आहेत. आरटीईत पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार १०८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ४४९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. निवड झालेल्या पैकी ५२ विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी समितीच्या त्रुटीत अडकले आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे असून, त्यानुसार हालचाली सुरू आहेत.
प्रवेशासाठी अवघे चार दिवस
आरटीईत पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सुरूवातीला ४ मे ची अंतीम मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये आता १० मे पर्यत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत.
मुदत वाढीची ४४९ विद्यार्थ्यांना संधी
प्रथम फेरीतील लॉटरी लागलेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी १० मे पर्यंत दिलेल्या मुदतवाढीची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे. या संधीमध्ये लॉटरी लागलेल्यापैकी व प्रवेश बाकी असलेल्या ४४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.