लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुरत-मेहकर बसमध्ये प्रवाशी सुरक्षा मानकांचा भंग केल्याप्रकरणी उप प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली असून ही बस ताब्यात घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुजरात पासिंग असलेल्या बस मालकास सुमारे पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या भरारी पथकासमवेत दोन जानेवारी रोजी अवैध प्रवाशी वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर होते. त्यावेळी जीजे-०३-डब्ल्यू-९९८५ क्रमांकाची खासगी शयनायन प्रवासी बस मोताळा ते बुलडाणा रस्त्या दरम्यान धावतांना या पथकास दिसली. वाहनाचा फिजीकल फिटनेस व एकंदरीत स्थिती पाहता या खासगी प्रवाशी बस विषयी उपप्रादेशिक परिवहन विभागास शंका आल्याने ही बस थांबवून बसची मोटार वाहन निरीक्षक निशीकांत वैद्य यांनी सहकाऱ्यांसमवेत तपासणी केली असता त्यात अनेक सुरक्षा मानकांचा भंग करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी ही बस थेट बुलडाणा बसस्थानकावर आणून त्यातील प्रवाशांना अन्य वाहनाद्वारे रवाना करण्यात आले. सोबतच बस चालकास दंड करण्यात आला. कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान या वाहनाचा विमाही उतरविल्या गेलेला नव्हता. त्यामुळे ही बसच ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, तीन जानेवारी रोजी वाहन चालकाने सुमारे पाच हजार रुपयाचा दंड भरला असल्याची माहिती खटला विभागातील अमोल खिरोडकर यांनी दिली. बसचा विमा उतरविल्या जात नाही तोवर ही बस प्रत्यक्षमार्गावर धावू शकणार नाही.
या मानकांचा भंगआपत्कालीन दवारजे नसणे, बसची लांबी प्रमाणापेक्षा अधिक असणे, बसमधील दोन आडव्या बर्थ जादा लावण्यात आले होते. त्यामुळे त्या मागील बाजूची आपत्कालीन खिडकी झाकल्या गेली होती, वाहनाचा विमाही काढल्या गेला नव्हता या बाबी तपासणीत समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक शशिकांत वैद्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.