रामजन्मभूमीसाठी शिर्ला नेमाने येथील कारसेवकाचे बलिदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 04:30 PM2020-08-04T16:30:55+5:302020-08-04T16:31:06+5:30
शिर्ला नेमाने येथील विष्णूदास नेमाने यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे समाधान त्यांच्या कुंटुंबियांना आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : अयोध्येत प्रभु श्रीरामाचे ऐतिहासिक राम मंदिराच्या लढ्यात खामगाव तालुक्यातील तालुक्यातील ३५० च्यावर कारसेवक सहभागी झाले. यापैकी शिर्ला नेमाने येथील विष्णूदास नेमाने यांना अयोध्येतच मरण आले होते. आता राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. अयोध्येत राम मंदिर उभारल्या जाणार असल्याने, शिर्ला नेमाने येथील विष्णूदास नेमाने यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे समाधान त्यांच्या कुंटुंबियांना आहे.
सुमारे २८ वर्षांपूर्वी अयोध्येतील विवादित ढाचा कारसेवकांच्या रॅलीने जमिनदोस्त केला. या रॅलीत देशभरातून दीड लाखाच्यावर कारसेवक सहभागी होते. यामध्ये विदर्भातील सहा जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. यामध्ये पश्चिम विदर्भातील विष्णुदास रामराव नेमाने (२८) यांचे नाव आघाडीवर होते. या घटनेनंतर शिर्ला नेमाने येथील अनेकांची गोपनिय चौकशीही करण्यात आली. विवादित ढाचा पाडण्यासाठी अयोध्येत गेलेले विष्णुदास नेमाने त्यावेळी अवघ्या २८ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर मोठा आघात झाला होता. आता विष्णुदास नेमाने यांच्या स्मृतीने त्यांचे कनिष्ठ बंधू प्रल्हाद नेमाने आणि सविता टाले, कावेरी मोहोड या भगिनींच्या डोळ्यात अश्रृ तरळतात.
शिर्ला नेमाने येथील ११ कारसेवक!
राम मंदिराच्या जागेवरील विवादित ढाचा पाडण्यासाठी देशभरातून दीड लाखावर कारसेवक अयोध्येत ०६ डिसेंबर १९९२ साली रेल्वेने अयोध्येत गेले होते. यामध्ये शिर्ला नेमाने येथील विष्णुदास रामराव नेमाने, निळकंठराव देशमुख, देविदास चव्हाण, अनिल देशमुख, भानुदास जाधव, हरिभाऊ काकड, श्रीकृष्ण खंडारे, नंदकिशोर जोशी, प्रमोद नेमाने, श्रीकृष्ण शिंदे, प्रल्हाद निंबाळकर यांचा समावेश होता. यात विवादित ढाच्याच्या ठिकाणीच विष्णुदास नेमाने मृत्युमुखी पडले होते.
राम मंदिराच्या लढ्यात मोठे भाऊ सहभागी होते. आता त्याच ठिकाणी राम मंदिराचे भूमिपूजन होत असल्याचे समाधान आहे. गड आला पण सिंह गेल्याचे दु:ख आहे.
- प्रल्हाद रामराव नेमाने
(विष्णुदास नेमाने यांचे लहान बंधू)
शिर्ला नेमाने ता. खामगाव.
राम मंदिराच्या ऐतिहासिक लढ्यात खामगाव तालुक्यातून ३५० च्यावर कारसेवक सहभागी झाले होते. स्वत: या लढ्यात सहभागी होतो. मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने कारसेवकांच्या बलिदानाचे सार्थक होत आहेत.
- बापू करंदीकर
कारसेवक, खामगाव.