राम मंदीरासाठी २३ वर्षे चप्पलचा त्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:23 AM2020-08-04T11:23:50+5:302020-08-04T11:24:35+5:30
१९८६ पासुन श्रीराम मंदीर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत २३ वर्षे पाळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंबा : अयोध्येत रामजन्मभुमीवर प्रभु रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे म्हणुन अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला, अनेकांनी बलीदान दिले होते. याच लढ्यातील एक सैनिक म्हणून वैकूंठवासी नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेत १९८६ पासुन श्रीराम मंदीर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा मरेपर्यंत २३ वर्षे पाळली.
नांदूरा तालुक्यातील तांदुळवाडी सिध्देश्वर येथील रहिवासी संत आदिशक्ती मुक्ताईचे निष्काम सेवाव्रती, वैकूंठवासी नारायण महाराज जुनारे अयोध्या आंदोलनात १९८६ पासुन सहभागी झाले होते. तेव्हापासून २३ वर्षे २००८ पर्यंत पायात बुट चप्पल, पादत्राणे त्यांनी उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात कधीच घातली नाही. तत्कालीन तालाखोलो आंदोलन व शिलापूजन, कारसेवा आदि प्रत्येक लढ्यात ते हिरिरीने सहभागी झाले.
त्यांनी राम मंदिराचा लढा घराघरात पोहचवला. विश्र्व हिंन्दु परिषद मोताळा प्रखंड प्रमुख, खामगाव जिल्हा संत समिती प्रमुख, विहिंप विदर्भ प्रांताचे आजीवन सदस्य या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतात राम मंदिर लढ्यातील एक निस्पृह तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख होती. श्रीरामपंत जोशी, राजेश जोशी, बापूसाहेब करंदीकर हे महाराजांच्या निस्पृह कार्याचा गौरव अनेक वेळा करीत होते. सहकारी भानुदास गोंड गुरुजी, विजू कुलकर्णी, नारायणदादा कोलते व अन्य कारसेवकासह अयोध्येत ते सुध्दा अग्रेसर होते. कारसेवेनंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी महाराज रावेर येथील वारकरी गोंडू बुवा यांच्याकडे तीन महिने राहिले.
आयुष्यभर आपल्या कीर्तन- प्रवचनात राममंदिर आंदोलन जनजागृती हा विषय ते लावून धरत होते. ते राम जन्मभूमीचे विचार बेधडकपणे मांडायचे. नारायण महाराज यांची मुक्ताईवर अपार निष्ठा होती.
आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प.पू.मोठेबाबा नेहमी कामानिमित्त विदर्भ कींवा खानदेशात आले तर आवर्जून विचारायचे नारायण बूवा यांनी बुट घातला की नाही, त्यांना बुट घालायला हावा, असे सांगायचे. परंतु गुरूंची सुध्दा माफी मागत शेवटपर्यंत त्यांनी प्रतिज्ञा मोडली नाही. प.पू. भास्करगिरी महाराज देवगड यांनी महाराजांचे पायांना जास्त त्रास होतांना पाहीले व लाकडी खडावा पाठवून दिल्या होत्या. आईसाहेब मुक्ताई फडावरील स्व.नारायण महाराज जुनारे रामजन्मभुमी आंदोलनातील एक पणती होते. आज अयोध्येत राममंदिर भुमीपूजन संपन्न होत आहे.