गणरायात साकारले विठ्ठल, श्रीकृष्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:37 PM2017-08-12T13:37:18+5:302017-08-12T13:48:43+5:30
बुलडाणा, दि. 12 - सर्वांना आतुरतेने वाट पाहायला लावणा-या बाप्पांचा उत्सव वघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या मुर्तीवर ...
बुलडाणा, दि. 12 - सर्वांना आतुरतेने वाट पाहायला लावणा-या बाप्पांचा उत्सव वघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या मुर्तीवर रंगरंगोटी करण्याच्या कामाला आता वेग आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मुर्तीकारांनी विध प्रकारच्या मुर्त्या बनविल्या असून गणरायाच्या मुर्तीमध्ये विठ्ठल व श्रीकृष्ण साकारलेल्या मुर्ती सर्वाधिक आकर्षीत करणा-या ठरत आहेत.
बाप्पांचा उत्सव जसजसा जवळ येतो तसतसा गुणरायाची मुर्ती घडविणा-या मुर्तीकारांच्या हातालाही वेग येतो. कच्च्या मालाच्या किंमती आणि कामगारांची मजुरी वाढल्याने गणेशमूर्तीच्या किंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटीमुळे ५ टक्क्याने यावर्षी वाढल्या आहे. परंतु यातही मुर्तीकारांनी आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती घडविण्याचे वैशिष्ट्य कमी केले नाही.
त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील गणपतींच्या मूर्तीना अनेक ठिकाणी मागणी वाढत आहे. मातीचे गणपती हे हाताळायला नाजूक आणि वजनाने जड असतात त्यामुळे वाहतूक करताना त्यांची मोडतोड होण्याची शक्यता असते. याशिवाय मातीचे गणपती बनवायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे मूर्तिकारांचा प्लास्टरच्या मूर्ती बनवण्याकडे जास्त कल आहे. बुलडाणा येथे अनेकजण गणरायांची मुर्ती घडवतात. यावर्षी गणरायाच्या मुर्तीमध्ये विठ्ठल, श्रीकृष्ण या देवांच्या साकारल्यामुळे ह्या मुर्त्यांना सर्वाधिक मागणी दिसून येत आहे. दरवर्षी गयरायाच्या मुर्तीला वेगळेपण आणण्यासाठी हे मुर्तीकार झटत असतात. यावर्षी विठ्ठल व श्रीकृष्णाचे रुप गणरायाच्या मुर्ती मुर्तीकारांनी घडविलेले पाहावयास मिळत आहे. या मुर्त्यांचीच सर्वाधिक मागणी सुद्धा होत असल्याचे मुर्तीकारांनी सांगितले.
‘बाहुबली’ वेधते लक्ष
बुलडाण्यातील मुर्तीकारांनी विठ्ठल व श्रीकृष्णांच्या मुर्ती सर्वाधिक बनविलेल्या आहेत. मात्र मोठ्या गणेश मंडळांकडून ‘बाहुबली’सारखी तयार करण्यात आलेल्या गणरायाची मुर्ती मागविल्या जात आहेत. त्यामुळे बुलडाणा तालुक्यातील सव येथे बाहुबलीची सर्वात मोठी मुर्ती बनविण्यात आलेली आहे. बाहुबलीप्रमाणे साकारलेली गणरायाची मुर्ती सर्वांचे लक्ष वेधत आहे.