वासुदेव दामधर लोकमत न्यूज नेटवर्कवानखेड (ता. संग्रामपूर) : देवीच्या एकाच मुर्तीची दोन मंदीरात स्थलांतराची अनोखी परंपरा संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे जोपासली जाते. जगदंबा मातेचा यात्रा महोत्सव १ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यान पार पडत आहे. मंगळवारी दहिहांडी व महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. या महोत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. येथील वान नदीच्या दोन तिरावर देवीची दोन पुरातन मंदीर असून पौष पौर्णिमेला (यात्रा उत्सवादम्यान) महिना भरासाठी देवीच्या मुर्तीचे गावाबाहेरील मंदीरात स्थलांतर केले जाते. तर महिनाभराच्या वास्तव्यानंतर माघ पौर्णिमेला देवीच्या मुर्तीची पुन्हा गावातील मंदीरात स्थापना करण्यात येते. या स्थलांतराला देवीच्या सासर-माहेरची संकल्पना दिली असून ही आगळी परंपरा येथे वर्षानुवर्षापासून जोपासल्या जात आहे. सातपुड्याच्या कुशीतून उगम पावलेल्या वान नदी तिरावर संग्रामपूर तालुक्यातील वानखेड हे गाव वसले आहे. वानखेड गावाचे अपराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेचे नदीच्या तिरावर दोन पुरातन मंदीरे असून यामधील पैलतिरावरील मंदीर हेमांडपंथी इंग्रजकालीन आहे. तुळजाभवानीची लोभस मुर्ती येथे विराजमान असल्याची आख्यायिका आहे. मुळ पिठाच्या माता जगदंबेच्या तीन मुर्ती वानखेड गावातील मंदीरात विराजमान आहेत. मंदीरासमोर महाद्वार असून मातेचा रथ ठेवण्याची जागा आहे. एका आख्यायिकेनुसार देवीच्या मुर्ती ह्या पैलतिरावरील मंदीरात होत्या. तेव्हा शिवकाळातील शक्ती उपासक अमृतराव देशमुख यांच्या स्वप्नात येवून प्रतिस्थापनेची आज्ञा श्री जगदंबा मातेकडून त्यांना झाली होती. त्यानंतर सद्यस्थितीत असलेल्या गावातील मंदीरात गावकºयांच्यावतीने त्रयमुर्तीची पुन्हा स्थापना, प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याचा इतिहास आहे. वानखेड येथील मातेच्या मंदीरात अनेक उत्सवापैकी दोन उत्सव अती हर्षोल्लासात साजरे करण्यात येतात. त्यापैकी पहिला उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव असून दुसरा उत्सव पौष पौर्णिमेला यात्रा उत्सव पौष पौर्णिमेला सकाळी मातेला जलाभिषेक आरती होवून पालखी सोहळ्याअंतर्गत संपुर्ण गावामधून वाजत गाजत पालखीची मिरवणूक निघत असते. पालखीच्या दर्शनासाठी हजारो भाविक वानखेड येथे येत असतात. सोमवारी रात्री १२ वाजता प्रभु रामचंद्राचा रथ संपुर्ण गावात निघून सिताहरण, कुंभकर्ण वध, रावण वध व शेवटी भरत भेट असा रामायणावर आधारीत कार्यक्रम सादर होणार आहे. तर मंगळवारी दुसºया दिवशी दहिहांडी व महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम पार पडेल.
जगदंबा मातेच्या स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड गेल्या अनेक वर्षापासून राबविण्यात येते. महाराष्ट्रात स्थलांतराची एकमेव परंपरा वानखेड येथे सुरू आहे. गावातील, परिसरातील नव्हे महाराष्ट्रातील भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.- आनंदराव देशमुख, अध्यक्ष श्री जगदंबा देवी संस्थान वानखेड