मलकापूर पांगरा : येथील ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता बंडू उगले निवड झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी सुटीवर गेल्याने प्रभार उपसरपंच भगवानराव उगले यांच्याकडे आला आहे. गावात निवडणुकीपूर्वी ठरले हाेते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे़
मलकापूर पांगरा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भगवानराव उगले यांच्या पॅनलले सत्ता मिळवली आहे़ महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदी अनिता उगले यांची निवड झाली हाेती. ग्रामपंचायत अस्तित्वात येऊन अवघे सहाच महिने लोटले. सहा महिन्यांतच महिला सरपंच रजेवर का, असेही प्रश्न उपस्थित हाेत आहेत. गावातील सर्वांगीण विकास करण्याऐवजी खासगी कामासाठी सरपंच सुट्टीवर गेल्याने विकास होणार की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र उपसरपंच भगवानराव उगले यांनी पदभार स्वीकारत मी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले हाेते़
सरपंच यांच्या रजेचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार रीतसर सभा घेण्यात आली़ सरपंच रजेवर गेल्यामुळे व त्यांची रजा पंचायतीने मंजूर केल्यामुळे उपसरपंच भगवानराव उगले यांना रीतसर प्रभार देण्यात आला आहे़
उद्धव गायकवाड, ग्रामविकास अधिकारी