शाळा सिद्धी प्रकल्प : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६६२ शाळा ‘अ’ श्रेणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:58 AM2017-12-26T00:58:58+5:302017-12-26T00:59:29+5:30

'शाळा सिद्धी' या उपक्रमांतर्गत सन २0१६-१७ च्या केलेल्या स्वयंमूल्यांकनात बुलडाणा जिल्ह्यातील ६६२ शाळा 'अ' श्रेणीत आल्या आहेत. त्यामुळे पटसंख्या कमी असली तरी गुणवत्ता असलेल्या शाळा बंद न करण्याची मागणी होत आहे.

School Siddhi Project: 662 schools of 'Buldhana Zilla Parishad' in category 'A'! | शाळा सिद्धी प्रकल्प : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६६२ शाळा ‘अ’ श्रेणीत!

शाळा सिद्धी प्रकल्प : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६६२ शाळा ‘अ’ श्रेणीत!

Next
ठळक मुद्देदोन हजार ४३२ शाळांचे मूल्यांकन

हर्षनंदन वाघ। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :   शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी गुणवत्तापूर्ण शाळांची आवश्यकता असते. अशा गुणवत्तापूर्ण शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शाळा सिद्धी उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत  सन २0१६-१७ च्या केलेल्या स्वयंमूल्यांकनात जिल्ह्यातील ६६२ शाळा अ श्रेणीत आल्या आहेत. त्यामुळे पटसंख्या कमी असली तरी गुणवत्ता असलेल्या शाळा बंद न करण्याची मागणी होत आहे.
गुणवत्तापूर्ण शाळांच्या मूल्यांकनासाठी राबविण्यात येणार्‍या शाळा सिद्धी उपक्रमात जिल्हा परिषद, नगरपालिका, खासगी अनुदानित, विनाअनुदानित असलेल्या सर्व माध्यमे व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी ग्रामविकास विभागाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे विविध २00 गुणांवर आधारित स्वयंमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यात इतर सोयी-सुविधांप्रमाणे अ, ब, क श्रेणी देण्यात आल्या होत्या. या निर्णयाप्रमाणे २0१६-१७ मध्ये जिल्ह्यातील एकूण २ हजार ४५७ शाळांपैकी २ हजार ४३२ शाळांनी स्वयंमूल्यमापनाचे ऑनलाइन अहवाल सादर केले होते. त्यात अ वर्ग श्रेणीच्या ६६२, ब वर्ग श्रेणीत १ हजार ६८३ तर क वर्ग श्रेणीत ९१ शाळांचा समावेश आहे. 
शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे येणार्‍या नवीन वर्षात गुणवत्तापूर्ण शाळांच्या श्रेणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक शिक्षक प्रयत्न करीत आहेत.

शालेय व्यवस्थापन आणि अध्ययनाला विशेष महत्त्व
शाळांचे २00 गुणांवर स्वयंमूल्यांकन करताना भौतिक सुविधांना ३५, शालेय व्यवस्थापनाला ६५ आणि अध्ययनाला १00 गुण देण्यात आले होते. या मूल्यांकनात शाळांत उपलब्ध भौतिक सुविधा, शिक्षक-पालक बैठका, माता-पालक संघ, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेची इमारत, वर्गखोल्या, प्रयोगशाळा तसेच संगणक कक्षाची उपलब्धता, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे, शाळेला कंपाउंड वॉल आणि मैदाने असणे अशा विविध निकषांचा समावेश करण्यात आला होता.

पटसंख्या कमी असलेल्या गुणवत्तापूर्ण शाळा बंद करू नये
शासनाने सन २0१६ मध्ये १0 पटसंख्येच्या आत असलेल्या १ हजार ३00 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील २१ शाळांचा समावेश होता; मात्र स्वयंमूल्यमापन ऑनलाइन अहवालात यापैकी ४ शाळा प्रगतीपथावर असून, जवळपास १0 ते १२ शाळा वर्ग अ, ब व क मध्ये येत आहेत. त्यावरून या शाळांची पटसंख्या कमी असली तरी शाळा गुणवत्तापूर्ण आहेत. त्यामुळे कमी पटसंख्येच्या नावाखाली गुणवत्तापूर्ण  शाळा बंद करू नये, अशी मागणी होत आहे. 
 

Web Title: School Siddhi Project: 662 schools of 'Buldhana Zilla Parishad' in category 'A'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.