डोणगाव (जि . बुलडाणा ) : नोंदणीकृत केंद्र असतानाही रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवणे तथा परजिल्ह्यातील महिला रुग्णांची मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावर येथील दत्तात्रय रुग्णालय आणि सिंधू मॅटरनिटी होममधील दोन सोनोग्राफी मशीन पीसीएनडीटीपी पथकाने तब्बल दहा तपासणी करून सील केल्या आहेत. दरम्यान, या कारवाईमध्ये अनेक आक्षेपार्ह्य बाबी समोर आल्या असल्याचे कारवाई करणार्या पथकाचे म्हणणे आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या डोणगाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवार नऊ मार्चला दुपारी दीड वाजता सुरू झालेली ही कारवाई दहा मार्च रोजी पहाटे दीड वाजेपर्यंत सुरू होती. मेहकरच्या वैद्यकीय अधीक्षीका डॉ. स्वाती रावते, वंदना तायडे, डॉ. नयना भालेराव, डॉ. श्याम ठोंबरे, तहसिलदार संतोष काकडे, ठाणेदार आकाश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. डॉ. संजय धाडकर यांचे हे रुग्णालय असून एप्रिल २०१७ मध्येही धडक तपासणी मोहिमेतंर्गतही या रुग्णालयातील संबंधित कामकाजामध्ये अनियमितता आढळी होती. त्यावेळी प्रकरणी सक्त ताकिद देऊनही सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे गुरूवारी पुन्हा धडक मोहिमेतंर्गत ही तपासणी करून कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान रेकॉर्डमध्ये अनेक त्रुट्या आढळून आल्या. पाच कॉलमचे रजिस्टर मेंटेन न करणे, तपासणी झालेल्यांचे पत्ते योग्य पद्धतीत नसणे, दुसर्या जिल्ह्यातील रुग्णांची अधिक तपासणी, दोन किंवा तीन मुली असलेल्यांची संख्या जास्त असणे यासंदर्भात चौकशीमध्ये डॉक्टर समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत त्यामुळे दुपारी दीड वाजता सुरू झालेली कारवाई ही दुसऱ्या दिवशी पहाटे दीड वाजेपर्यंत अशी दहा तास सुरू होती. त्यानंतर दोन्ही सोनोग्राफी मशीनला सील लावण्यात येऊन संपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. येथे एमटीपी सेंटरही आहे. मागील तपासणीमध्ये त्याच्या रेकॉर्डमध्येही त्रुटी आढळून आल्या. प्रकरण न्यायालयात दाखल करणार दोन्ही मशीन सील केल्यानंतर व कागदपत्रे जप्त केल्यानंतर डोणगावमधील हे प्रकरण न्यायालयात दाखल करणार आहे. दरम्यान, त्या अगोदर जिल्हास्तरावरील समिती या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन त्यात होणार्या निर्णयाच्या आधारावर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. परजिल्ह्यातून येणार्यांची संख्या अधिक या रुग्णालयात सोनोग्राफी तपासणीसाठी परजिल्ह्यातून येणार्या गर्भवतींची संख्या अधिक असल्याचे मेहकरच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. स्वाती रावते यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. विशेष म्हणजे दोन किंवा तीन मुली असलेल्यांची संख्या यात अधिक आहे. बेकायदा गर्भलिंग निदान येथे होत असल्याचा संशय कारवाईदरम्यान अधिक बळावला आहे. सोबतच आक्षेपार्ह्य बाबीही आढळ््या असल्याचे डॉ. रावते म्हणाल्या.
दोन सोनोग्राफी मशीन सील केल्या आहेत. आता जिल्हा स्तरीय समितीमध्ये या प्रकरणावर चौकशी होऊन निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल केले जाईल.
- पी. बी. पंडीत, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा