बुलडाणा : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने लोकांमधील डिप्रेशन वाढविल्याचे दिसून येत आहे. अशावेळी डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी मनाने गोळ्या घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गोळ्या वा इतर औषधी घ्यावीत, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे कामधंदे बंद झाले आहेत. अनेकजण आहे, त्या कामावरून घरी बसविले आहेत. अशावेळी त्यांच्यामध्ये डिप्रेशन येणे साहजिकच आहे. असे असताना त्यांनी डिप्रेशनमध्ये न जाता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. निराश होऊन कोणत्याही गोळ्या घेणे म्हणजे ते शरीरासाठी हानिकारच असते.
डिप्रेशन (उदासीनता) हे सौम्य, मध्यम आणि अतिशय तीव्र अशा तीन टप्प्यांमध्ये मोडले जाते. विशेष म्हणजे डिप्रेशन हे अनुवंशिक असते. कुणाला आईकडून, कुणाला वडिलांकडून तर कुणाला आजी-आजोबांच्या रक्तातून डिप्रेशन हे कोणत्याही मार्गाने येऊ शकते. त्यामुळे माणूस उदासीन बनतो. यामध्ये बाहेरील वलयही त्यास कारणीभूत असू शकते.
डिप्रेशन का वाढते?
डिप्रेशनमध्ये जाण्याची काही प्रमुख लक्षणे आहेत. हे लक्षणे दिसू लागताच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. यामध्ये उदास वाटणे, झोप न येणे, जेवण कमी जाणे, तेच तेच विचार येणे आदी. याचबरोबर आत्महत्या करण्याचे विचार मनात वेळोवेळी येणे, काम करताना किंवा इतर वेळी डोके जड राहणे, छोट्या-छोट्या गोष्टीच्या कारणांवरून चिडचिड होणे आदी कारणांमुळे डिप्रेशन येते. विशेष म्हणजे विसरभोळेपणा येणे, जीवनात जगावेसे न वाटणे, कामात मन लागणे आदी कारणेही डिप्रेशनसाठी कारणीभूत आहेत.
...........प्रतिक्रीया...................
तशी कोणतीही औषधी विकली नाही
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना डिप्रेशन आले असले तरी अशा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या किंवा औषधी विकली गेली नाहीत. विशेष म्हणजे कोरोना बरा होण्यासाठी आयुर्वेदिक औषधी मात्र अनेक जण घेऊन जातात. आयुर्वेदिक औषधाला मागणीही आहे. बाकी इतर आजारांची औषधीही रुग्ण घेऊन जात असल्याने एका औषध विक्रेत्याने सांगितले़
तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
जास्तीचे काम लागल्यास कधी-कधी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. तसेच कधी-कधी लक्षणेही लक्षात येत नाहीत. अशावेळी रात्रीला जेवण करून शांतपणे पूर्ण झोप घेणे. कोणत्याही गोष्टीवरुन चिडचिडपणा येत असल्यास त्यावेळी त्यांच्याशी बोलणे टाळावे. हा आजार काही तसा दुर्धर आजार नाही. उदासपणा वाटणे, आत्महत्याचे विचार मनात येणे, छोट्या छोट्या गोष्टीवरुन चिडचिडपणा येणे, घरातल्या वस्तूंवर आदळआपट करणे, कामात विसरभोळा येणे, जीवनात जगावेसे न वाटणे आदीमुळे जास्त ताण येतो. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डिप्रेशन टाळण्यासाठी पुढील उपाय करणे आवश्यक
डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी आपली पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे. अर्धवट झोपेमुळे कधीकधी ताणतणाव येतो. जास्तीच्या कामाचा ताण कधीही घेऊ नये. जास्त काम लागत असल्यास सुटी घेणे हे त्यासाठी फायद्याचेच आहे. विशेष करुन जेवणात चांगला पौष्टिक आहार खाणे हे डिप्रेशनमधील व्यक्तीसाठी लाभदायकच आहे. कोणत्याही प्रकारची चिडचिड जेवताना करु नये. आनंदाने जेवण करणे हेही अतिलाभदायक आहे. गोळी अथवा इतर औषधी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत.