‘कुटुंबा’तच सशक्त, आदर्श समाजाची बीजं - डॉ. निर्मला जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:50 PM2019-08-11T12:50:10+5:302019-08-11T12:50:19+5:30
कुटुंब व्यवस्थेतच सशक्त आणि आदर्श समाज व्यवस्थेची बीजं रुजलेली आहेत.
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मानसिक छळ आणि कौटुंबिक हिंसाचारामुळे समाज व्यवस्थेची चाळणी होत आहे. महिलांवरील अन्यायाला आळा बसावा यासाठी महिला तक्रार निवारण समित्या गठीत केल्या आहेत. मात्र, तरीही घरगुती आणि कामाच्या ठिकाणी महिलांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत आहे. हे समाजाचे दुर्देव म्हणावे लागेल. महिला तक्रार निवारण समितीच्या डॉ. निर्मला जाधव यांच्याशी साधलेला संवाद...
आधुनिक युगात स्त्रीयांसमोरील आव्हानं कमी झालीत का?
निश्चितच नाहीत, पूर्वीच्या काळी भारतात मातृसत्ताक कुटुंब पध्दती अस्तित्वात होती. कालांतराने पितृसत्ताक पध्दती अस्तित्वात आली. आता ५० टक्के समानता दिसत असली तरी, स्त्रीयांवरील बंधनं अजिबात कमी झालेली नाहीत.
समाजातील वाढत्या कलहावर नियंत्रण शक्य आहे का?
निश्चितच का नाही!, नैतिक अधपतनामुळे नातेसंबधांतील तणाव वाढीस लागला आहे. अगदी लहानशा गोष्टीवरून कुटुंबांत कटुता निर्माण होत आहे. मात्र, विवाद सोडल्यास समाजातील वाढत्या कलहावर निर्बंध लादता येऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीत आत्मसन्माना ऐवजी दुसºयांचा सन्मान करायला शिकले की, अनेकदा वादावर नियत्रंण मिळविता येते.
महिला तक्रार निवारण समितीला नवीन आयाम देण्यासाठी काय कराल?
स्त्री आणि पुरूष ही संसार रथाची दोन चाकं आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे कुण्या एकालाही महत्व देऊन चालणार नाही. स्त्रीयां ह्या समाजाचे अर्धांग असून तिला सर्वांगाणं विकसीत करणं समाजाचे दायित्व आहे. मात्र, त्याचवेळी स्त्रीनं मिळालेल्या स्वातंत्र्यांचा स्वैराचार म्हणून उपभोग घेणं चुकीचे आहे. त्यामुळे महिला तक्रार निवारण समितीला स्त्री-पुरूष समानतेचे वळण देण्यासाठी आपले सामाजिक बांधिलकीतून प्रयत्न राहतील.कुटुंब हीच मनुष्याची पहीली पाठशाळा आहे. कुटुंब व्यवस्थेतच सशक्त आणि आदर्श समाज व्यवस्थेची बीजं रुजलेली आहेत. अलिकडच्या काळात कुटुंब व्यवस्था लयास जात असल्याने समाजात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, कोणत्याही समस्या या संयमाने निकाली निघतात.
आपल्या मते घरातील वाढत्या कलहास जबाबदार कोण?
सद्भावना लयास गेल्याने आजच्या समाज व्यवस्थेत कलह वाढीस लागले आहेत. क्षणिक स्वार्थ हे गृह कलह वाढीस लागण्याचे दुसरे महत्वाचे कारण होय. जुन्या पिढीतील आदर्श बाजूला ठेवल्यानेच समाजात अनेक वाईट घटना घडताहेत. मात्र, नाते संबंध टिकवून ठेवल्यास आणि स्वातंत्र्याला स्वैराचार न समजल्यास गृह कलहावर नियंत्रण आणता येते. साध्यासाध्या गोष्टीवरून संबधांमध्ये तणाव निर्माण होत असल्याने, कलहास कुण्या एकास जबाबदार धरता येणार नाही.