सलाईनच्या द्रावणाची रेमडेसिविर म्हणून विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 06:20 PM2021-05-08T18:20:09+5:302021-05-08T18:20:46+5:30
Remedicivir in Buldhana : आता या इंजेक्शनचे नमुने हे मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
बुलडाण्यात बनावट रेमडेसिविरची विक्री?
बुलडाणा: स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केलेल्या तिघांकडून जप्त करण्यात आलेल्या ९ रेमडेसिविर इंजेक्शन पैकी आठ इंजेक्शन बनावट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान आता या इंजेक्शनचे नमुने हे मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. अन्य रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनमध्ये सलाईनमधील पाणी टाकून ते विकण्याचा धंदाच या तीनही आरोपींनी सुरू केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलडाणा येथील जांभरून रोडवर आणि येळगाव फाटा येथे कारवाई करून राम शंकर गडाख (रा. येळगाव), लक्ष्मण विष्णू तरमळे (रा. पिंपळगाव सराई) आणि संजय सुखदेव इंगळे, रा. हतेडी, ह. मु. विदर्भ हाऊसिंग सोसायटी बुलडाणा) यांना शुक्रवारी अटक केली होती. चौकशीत त्यांच्या कडून नऊ रेमडेसिविर इंजेक्शन, सहा अँटीबायोटिकची इंजेक्शन जप्त केले होते. पोलिसांच्या चौकशीत या आरोपींनी वापरलेल्या इंजेक्शनमध्येच सलाईनमध्ये वापरण्यात येणारे ०.९ टक्के एनसीएल सोडियम क्लोराई टाकून तेच रेमडेसिविरचे इंजेक्शन म्हणून विक्री करण्याचा प्रयत्न चालवला होता. आता हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडून बुलडाणा शहर पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आले आहे. त्यामध्ये प्रसंगी शहरातील ज्या दोन नामांकित रुग्णालयात हे तिघे काम करत होते त्या रुग्णालयातील डॉक्टरांचीही तपासाचा एक भाग म्हणून प्रसंगी चौकशी होण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांनी व्यक्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री होत असल्याची दोन प्रकरणे उजेडात आली आहे. शुक्रवारच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या नऊ इंजेक्शन पैकी एकच ोरिजनल इंजेक्शन होते तर अन्य आठ इंजेक्शन ही बनावट होती. दरम्यान आता या इंजेक्शनचे नमुने हे मुंबई येथील प्रयोग शाळेत अन्न व अैाषध प्रशासन विभाग तपासणीसाठी पाठविणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.