विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांना मिळेना धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:29+5:302021-05-22T04:32:29+5:30
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाकडून मोफत धान्यवाटपाला सुरुवात झाली आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांमध्ये विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त ...
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाकडून मोफत धान्यवाटपाला सुरुवात झाली आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांमध्ये विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा लाभ मिळत नाही. शिधापत्रिका असूनही मोफत किंवा इतर सवलतीच्या दरातील धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. आमच्यावरच हा अन्याय का, असा प्रश्न विभक्त शिधापत्रिकाधारकांमधून उपस्थित होत आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गोरगरीब धान्यापासून वंचित राह नये, याकरिता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात या धान्यवाटपाला सुरुवातही झालेली आहे. परंतु, या अडचणीच्या काळात विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांनाच पुरवठा विभागाच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्याकरिता नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करताना ३० जून २०१९ पर्यंतच्याच लाभार्थ्यांचा विचार करण्यात येत आहे. त्यामुळे ३० जून २०१९ नंतर विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील धान्य मिळत नाही. परिणामी, विभक्त शिधापत्रिकाधारक अडचणीत सापडले आहेत.
इष्टांक वाढीनंतर टप्प्याटप्प्याने मिळणार लाभ
जिल्ह्यात दोन वर्षांपासून विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांना धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागाकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये जे शिधापत्रिकाधारक अपात्र ठरले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशी नावे कमी करून विभक्त झालेल्यांची नावे त्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. यासंदर्भातील अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला आहे. त्यामुळे इष्टांक वाढवून आल्यानंतरच टप्प्याटप्प्याने विभक्त शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा लाभ दिला जाणार आहे.
३० जून २०१९ पर्यंतच्या योग्य व गरजू असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांचाच प्रश्न आहे. त्यासाठी शासनाकडे माहिती पाठविण्यात आलेली आहे. अपात्र शिधापत्रिकांची नावे कमी करून इष्टांक वाढविण्यात येईल.
गणेश बेल्लाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा
अंत्योदय योजना कार्डधारक ६४७९८
प्राधान्यक्रम योजनेतील कार्डधारक ३३८९१३
शेतकरी कुटुंबातील कार्डधारक ८५२४०
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या
बुलडाणा १५०
चिखली १७१
देऊळगाव राजा ८३
जळगाव जामोद ९९
खामगाव १५८
लोणार ९६
मलकापूर ८१
मेहकर १७४
मोताळा १११
नांदुरा १०२
संग्रामपूर ९८
सिंदखेड राजा १२३
शेगाव ९०