धाडनजीक वनपरिक्षेत्र असल्याने आणि वनविभागाच्या अगदी जवळच शेती शिवार असल्याने हरीण, काळवीट, तडस, कोल्हे, रानरोही, माकड, रानडुक्कर यांसारखे वन्यजीव आहाराच्या शोधार्थ जंगल सोडून मानवीवस्तीत प्रवेश करत आहेत. मात्र मुक्त संचाराने वन्यप्राण्यांना अपघात घडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दोन नर काळविटांच्या जोरदार झुंजीत एक नर काळवीट गंभीर जखमी झाले हाेते. त्यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली. पाऊस असल्याने भटक्या कुत्र्यांच्या तावडीत ते काळवीट सापडले. त्याच्यावर कुत्र्यांनी जोरदार हल्ला चढवला. ही बाब शेतकरी भगवान तायडे, अमोल तायडे, विनोद भोंडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी काळविटाची सुटका केली. याविषयी प्राणिमित्र नीलेश गुजर यांना माहिती देण्यात आली. त्यांनी जखमी काळविटाला उपचार देऊन वनविभागाच्या ताब्यात दिले.
वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार
धाड परिसरात वन्यप्राण्यांच्या मुक्त वावराने शेतकरी हैराण झाले आहेत. वन्यप्राणी पिकांची अतोनात नासाडी करीत आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी वनविभागाने वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे. धाड भागातील जंगलात हरीण, काळविटांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे.
वन्यजीव सातत्याने शेतशिवारात मुक्तसंचार करत आहेत आणि आहार शोधताना त्यांना अपघात होतात. या प्राण्यांवर मोकाट कुत्रे हल्ला करून जखमी करतात. वन्यप्राण्यांना घात केला म्हणून काही गुन्हा वैगेरे होईल या भीतीपोटी शेतकरी जखमी वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी समोर येत नाहीत. यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
नीलेश गुजर, प्राणी आणि सर्पमित्र, धाड