मेहकर : तालुक्यातील विविध ठिकाणी सुवर्ण जयंती राजस्व अभियान मंडळाच्यावतीने पांदन शेतरस्त्याचे काम करण्यात आले असून, ठिकाणी लोकवर्गणी व श्रमदानातून पांदन शेतरस्ते उभारण्यात आले आहेत. अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या अशा अनेक पांदन शेतरस्त्यांनी शेतकर्यांच्या पुढाकारामुळे मोकळे श्वास घेतला आहे. मोठमोठय़ा पांदन शेतरस्त्याच्या भोवती झालेल्या अतिक्रमणामुळे हे रस्त्या गल्या बनत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांना त्या रस्त्याने शेतात जाणे अवघड होऊन बसते. काही शेतकर्यांनी पांदन शेतरस्त्यालाच आपली शेती बनविल्याने समोर जाणार्या इतर शेतकर्यांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागतो. तसेच शेतकर्यांमध्ये यामुळे वाद उद्भवल्याच्या घटनाही घडत आहेत. शेतकर्याच्या आर्थिक उन्नतीसाठी व शेतात जाण्यास सोयीचे होण्यासाठी शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान मंडळाच्यावतीने तालुक्यातील अनेक ठिकाणी पांदन शेतरस्त्यांचे काम करण्यात आले आहे. तालुक्यातील ब्रम्हपुरी फाट्यानीकचा रस्ता शेतकर्यांना अडचणीचा ठरला होता. त्यासाठी तहसिलदार निर्भय जैन यांना निवेदन देऊन रस्ता तयार करुन देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शेतकर्यांनी लोकवर्गणी जमा करुन सदर शेतरस्ता जेसीबीच्या साहाय्याने तयार केला. सदर रस्ता हा तहसिलदार निर्भय जैन, नायब तहसिलदार डाखे, मंडळ अधिकारी डाखोरे, तलाठी होणे यांच्या उपस्थितीत शेतकर्यांना खुला करुन देण्यात आला. यावेळी उपसरपंच मनोज गिर्हे, संजय वडतकर, बद्री गिर्हे, श्याम मुळे, राजू गुंजकर, रामेश्वर धंदर, अरुण गावंडे आदी शेतकरी उपस्थित होते. सुवर्ण जयंती महसुल अभियान अंतर्गत तहसिलदार निर्भय जैन यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदला ते जानेफळ हा पांदन रस्ता लोकसहभागातून अतिक्रमण मुक्त करण्यात आला. यावेळी वैभव रहाटे, राजाभाऊ रहाटे, मंगळ रहाटे, संजू रहाटे, चंदु रहाटे, देवराव सरदार, दिलीप रहाटे, कचरू रहाटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यासह तालुक्यातील अनेक ठिकाणचे शेतरस्ते लोकसहभागातून खुले झाल्याने शेतकर्यांसाठी सोयीचे झाले आहे.
मेहकर तालुक्यात लोकसहभागातून शेतरस्ते
By admin | Published: July 12, 2014 10:22 PM