बुलडाणा जिल्ह्यात आता १३ ठिकाणी शिवभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:23 PM2020-03-31T12:23:05+5:302020-03-31T12:25:51+5:30
या १३ केंद्रावर प्रतिदिन १ हजार १०० शिवथाळींचे वाटप केले जाणार आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लॉकडाऊनमुळे बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर व स्थलांतरित लोकांसाठी तालुकास्तरावरही शिवभोजन सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात आता नव्याने १३ ठिकाणी तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्याचे नियोजन पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. या १३ केंद्रावर प्रतिदिन १ हजार १०० शिवथाळींचे वाटप केले जाणार आहे.
आतापर्यंत जिल्हा मुख्यालयी शिवभोजन सुरू होते. बुलडाणा येथील शिवभोजन केंद्रावरून ५०० शिवथाळींचे वितरण करण्यात येत आहे. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बाहेरगावचे विद्यार्थी, काही स्थलांतरीत लोक अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे या नागरिकांचे जेवणाअभावी हाल होऊ नये, यासाठी तालुकास्तरावर शिवभोजन सुरू करण्यात येत आहे. रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाहीत, यासाठी तातडीने शिवभोजन सुरू करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व तहसीलदारांना सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यात १३ तालुक्यात १३ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर याठिकाणी प्रतिदिन १ हजार १०० शिवथाळ्यांचे वितरण केले जाणार आहे. यापैकी संग्रामपूर आणि बुलडाणा येथे तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. इतर ठिकाणी १ एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्यासाठी तहसील कार्यालयाकडून सर्व माहिती गोळा करण्यात येत आहे. भोजनालय दररोज फक्त दुपारी ११ ते ३ या वेळेत सुरू राहणार आहे.
अशी घ्यावी लागणार खबरदारी
भोजनालय चालकांनी ग्राहकांना आवेष्टित स्वरूपात (पॅकेज फूड) भोजन उपलब्ध करून द्यावे, शिवभोजर तयार करण्याआधी त्या व्यक्तीने त्यांचे हात कमीत कमी २० सेकंद साबणाने धुवावेत. सर्व भांडी निर्जुंतुक करून घ्यावित. शिवभोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात तालुकास्तरीय शिवभोजन सुरू करण्याबाबत सर्व तहसीलदारांना सुचना दिल्या आहेत. दोन ठिकाणी शिवथाळींचे वाटप सुरू झाले आहे. १ एप्रिलला सर्वच ठिकाणी केंद्र सुरू होईल.
- गणेश बेल्लाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलडाणा.