- अनिल गवई खामगाव: विद्यार्थी आणि पालकांंना विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींची जाण करून देण्यासाठी यावर्षीपासून मोबाईल अॅपद्वारे ‘कल व अभिक्षमता चाचणी’ घेतली जात आहे. विद्यार्थी आणि पालकांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचा हा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्हास्तरावरील व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन कक्षाच्यावतीने या उपक्रमाचे समन्वयन करण्यात आले. समुपदेशक अरविंद शिंगाडे यांच्याशी साधलेला संवाद... जिल्ह्यात कल व अभिक्षमता चाचणीची अंमलबजावणी कशी केली गेली? गत चार वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नीत माध्यमिक शाळांच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी घेतली जाते. यावर्षी पहिल्यांदा मोबाईल अॅपद्वारे विद्यार्थ्यांची ही चाचणी घेण्यात आली. एकूण ७ क्षेत्रांपैकी विद्यार्थ्यांचा कल निश्चित करणे हा या चाचणीचा मुख्य हेतू होता.कल चाचणी संदर्भात जिल्हा कक्षाकडून कशा पद्धतीने काम झाले? करिअर निवडीसंदर्भात पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सारखी चिंता असते. योग्यवेळी योग्य मार्गाची निवड झाली नाही, तर भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी या उपक्रमाचे महत्व तंत्रशुध्द पध्दतीने पटवून दिले. तालुका स्तरावर ‘मास्टर ट्रेनर्स’च्या माध्यमातून प्रत्येक शाळेतील अविरत प्रशिक्षणार्थी शिक्षकांना या चाचणीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रेरीत केले गेले.कल चाचणीचा विद्यार्थ्यांना कितपत उपयोग होईल? आपला सर्वोत्तम कल असलेल्या क्षेत्राशी संबंधित पूर्ण माहिती ‘महाकरिअरमित्र.इन’यासंकेत स्थळावर उपलब्ध आहे.तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील समुपदेशन कक्ष यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. भविष्यात ही चाचणी विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोगी ठरेल!स्पर्धेच्या व विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात प्रतिष्ठा व समाधान मिळवून देणारे करिअर आपल्या पाल्याने करावे, असे सर्वच पालकांना वाटते. त्यासाठी त्याच्या अंगी असणाºया क्षमता, आवड आणि योग्य संधी यांचा विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थी समुपदेशन कक्षाची आवश्यकता का भासली? .शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात आवश्यक आव्हाने पेलण्यासाठी व त्यांना मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य पध्दतीने मार्गदर्शन व्हावे, तसेच भविष्यातील समस्या टाळता याव्यात यासाठी जिल्हा स्तरावर माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. डीआयईसीपीडी बुलडाणा येथे प्राचार्य विजयकुमार शिंदे व विभागप्रमुख डॉ.रवी जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात दोन समुपदेशक कार्यरत आहेत. यामध्ये आपला समावेश आहे.
पाल्यांची आवड व क्षमतेनुसार करिअर निवडीसाठी पालकांनी प्रयत्नरत राहावे - अरविंद शिंगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 5:28 PM