ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 23 - शहरातील जनतेच्या प्रतीक्षेत असलेल्या सिग्नल यंत्रणा सुरू झाली असून येथील स्टेट बँकेच्या मुख्य चौकात वाहतुकीला शिस्त लागवण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचा-यांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे.
बुलडाणा शहरातील वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरात सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी होत होती. यासाठी काही वर्षापूर्वी सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली होती. मात्र पोलीस कर्मचा-यांची अल्प संख्या व शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडली होती.
दरम्यान शहरात जमिनीखाली टाकण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या केबलमुळे ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले. त्यात सिग्नल यंत्रणेच्या तारा तुटल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी रस्ते रंदीकरणामुळे सिग्नल यंत्रणेची दूरवस्था झाली. दरम्यान एका वर्षापूर्वी अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे व अनेक रस्त्यांचे रूंदीकरण व डांबरीकरणामुळे पुन्हा सिंग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी होवू लागली.
यासाठी पालिका प्रशासनाव्दारे निधी उपलब्ध झाल्यानंतर सिंग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली. परंतु पोलीस प्रशासनाव्दारे याबाबत कार्यवाही होत नसल्यामुळे सिंग्नल यंत्रणा बंद पडली होती. याबाबत संबंधित यंत्रणेने पोलीस अधीक्षक मिना यांच्याशी चर्चा करून मागिल काही दिवसापासून सिंग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
सदर यंत्रणा सुरू झाल्यामुळे शहरातील तसेच शहरातून जाणाºया वाहतुकीला शिस्त लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)