दाेन दिवसात ९५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल
बुलडाणा : काेराेना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने शनिवार आणि रविवारी वीकेंड लाॅकडाऊन केले हाेते. या लाॅकडाऊनमध्येही अनेकजण दिलेल्या सवलतींचा लाभ घेत बाहेर फिरत हाेते. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ९०० जणांकडून वाहतूक शाखेने ९५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. बाहेर फिरणारे साहेब दवाखान्यात जाताेय, मेडिकलवर जात असल्याचे तीच ती कारणे सांगत असल्याचे समाेर आले.
राज्यभरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययाेजना करीत आहेत. त्याअंतर्गत शुक्रवारी सायंकाळपासून ते साेमवारी सकाळपर्यंत वीकेंड लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. या दरम्यान जीवनाश्यक वस्तू, रुग्णालये, मेडिकल,पेट्रोलपंप सुरू ठेवण्यात आले हाेते. काेराेना संसर्ग वाढत असताना सर्वसामान्य नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. वीकेंड लाॅकडाऊनमध्येही अनेक जण विनाकारण बाहेर फिरत हाेते. रुग्णालयात जात आहे, मेडिकलवर जात आहे, अशी तीच ती कारणे पाेलिसांना सांगण्यात येतात. पाेलिसांनी दाेन दिवस विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. शनिवारी आणि रविवारी ९०० जणांकडून वाहतुक शाखेने ९५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पाेलिसांनी दंडात्मक कारवाइ केली तरीही अनेक रिकामटेकडे शहरात फिरत असल्याचे चित्र हाेते. दुकाने बंद असली तरी रस्त्यावर मात्र काही प्रमाणात वर्दळ हाेती.
शनिवारी ३१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल
काेराेना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली हाेती. शनिवारी सकाळपासूनच पाेलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली हाेती. दिवसभर ४५२ जणांवर वाहतुक शाखेने कारवाई करून ३१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
रविवारी ४४८ जणांवर कारवाई
वीकेंड लाॅकडाऊनच्या दरम्यान संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पाेलिसांनी कारवाई केली. रविवारी पाेलिसांनी ४४८ जणांवर कारवाई केली. विनाकारण फिरणाऱ्यांकडून पाेलिसांनी ६४ हजार ६०० रुपयांचा दंड ठाेठावला. रविवारी शहरात वाहनांची वर्दळ सुरूच हाेती. काही किराणा दुकानदारांमध्ये दुकाने सुरू करण्यावरून संभ्रम हाेता. त्यामुळे, काही भागातील किराना दुकाने बंद तर काही भागातील सुरू हाेती.
बाहेर फिरणाऱ्यांची कारणे सारखीच
लाॅकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात फिरणाऱ्यांची कारणे सारखीच आहेत. रुग्णालयात जायचे आहे, मेडिकलवरून औषधी आणायची आहे अशी कारणे सांगून अनेकजण विनाकारण बाहेर पडतात. काही जण पेट्रोल टाकण्यासाठी तर काही जण रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असल्याचे सांगतात. काही जण डाॅक्टरांची जुनी औषधांची चिठ्ठी घेऊन फिरत आहेत.