- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, कर्जमाफीच्या यादीत नाव असल्यावरही एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे सहा हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार शेतकरी पीककर्जाचा लाभ घेतात. त्यापैकी १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी अजूनही आधार प्रमाणीकरण नसल्यामुळे कर्जमाफीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीत नाव आहे. मात्र, एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण झाले नाही. यावर्षी मार्च महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनामुळे ऑनलाइन सेंटर बंद होते. त्यामुळे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही. मात्र, त्यानंतर चार महिने झाल्यावरही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागत आहे. यासोबतच पीककर्जाची थकबाकी न ठेवता नियमित परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सरसकट देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षापूर्वी केली होती; परंतु अद्याप शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळाले नाहीत.
जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी आधार कार्ड प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे पीककर्जापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांनी त्वरित आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याची गरज आहे.-उत्तर मनवर, व्यवस्थापक, लिड बँक, बुलडाणा