लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्य परिवहन महामंडळाकडून सवलतीच्या दरात (अर्धे तिकीट) प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांसाठी कागदी पास ऐवजी बँक आणि आधार लिंक असलेले डिजीटल स्मार्ट कार्ड वितरीत केल्या जात आहे. या योजनेसाठी खामगाव तालुक्यातील सुमारे एक हजारावर जेष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे. यासाठी परिवहन मंडळाकडून फक्त ५५ रूपये नाममात्र शुल्क आकारण्यात येत आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रिद घेवून सुविधा पुरविण्यासाठी परिवहन मंडळांकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. अगोदर परिवहन मंडळाकडून प्रवाशांना प्रवासादरम्यान सवलतीच्या पासेस या कागदी स्वरूपात दिल्या जात होत्या. मात्र डिजीटल दुनियेत पाऊल टाकत परिवहन मंडळानेही प्रगती करत आता ज्येष्ठ नागरीकांसह दिव्यांग, महात्मा गांधी समाजसेवा व आदिवासी सेवक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, समाजभुषण व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी, अधिस्विकृती धारक पत्रकार आदिंना मोफत तर इतर नागरीकांसाठी सवलतीच्या दरात दिल्या जाणाºया कागदी पासेस आता डेबिट आणि क्रेडीट कार्डासारखे बँक आणि आधार लिंक असलेले डिजीटल कार्ड वितरीत केल्या जात आहेत. यासाठी प्रवाशांकडून स्मार्ट कार्डचे ५० रूपये तर आॅनलाईन फॉर्मचे ५ रूपये असे एकुण ५५ रूपये नाममात्र शुल्क घेतल्या जात आहे. सदर स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी खामगाव आगारामध्ये सुमारे १ हजार नागरीकांनी आॅनलाईन पध्दतीने नोंदणी केली आहे.नोंदणी येथील बसस्थानकातील पासेस केंद्रावर सुरू आहे. अर्ज भरताना ज्येष्ठ नागरीकांच्या अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर घेतला जाणार आहे. तसेच आधार कार्डाशी संलग्न माहिती प्राप्त झाल्यावर नाव नोंदणी होईल. नाव नोंदणी झाल्यावर १५ दिवसानंतर नोंदणी केलेल्या ठिकाणी स्मार्ट कार्ड प्राप्त होईल, अशी माहिती बसस्थानक प्रमुख पवार यांनी दिली.तसेच या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही केले. (प्रतिनिधी)
स्मार्ट कार्ड: खामगाव परिसरात एक हजार ज्येष्ठ नागरीकांची नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 2:34 PM