बुलडाणा: आक्रमक राजकारणी तथा आंदोलन फेम स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या संवेदनशीलतेचा परिचय देणारा किस्सा समोर आला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कुटुंबाचे छत्र हरपलेल्या तीन मुलांच्या पालनपोषणासोबतच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही ते आपला कामचा व्याप सांभाळून तितक्याच तत्परतेने करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या फेसबुकवर ‘ यामुळेच... तुपकरांचं नेतृत्व... काळजात घर करतं’, अशी पोस्ट फिरत असून या पोस्टची शहानिशा केली असता या आक्रमक राजकारणी व्यक्तिमत्वाच्या मनातील संवेदनशीलतेची किनार स्पष्ट झाली.
सुमारे पाच ते सात वर्षापूर्वी शेगाव तालुक्यातील खिरोडा पुलावरून बस नदीत कोसळून १९ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यात मच्छिंद्रखेड येथील मोलमजुरी करणाऱ्या कैलास भारंबे व त्यांच्या पत्नीचाही समावेश होता. मात्र काळाने झडप घातलेल्या या दांपत्याचे तीन मुले त्यामुळे अनाथ झाली होती तर त्यांची वयोवृद्ध आजी बघून गहिवरलेल्या तुपकरांनी तीनही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. तीनही मुलांच्या निकटवर्तीयांना त्याची कल्पना देत पत्नी शर्वरीचेही समर्थन घेत वैष्णवी, श्रेया आणि चेतन या तीन मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली. आज वैष्णवी नगर येथील त्रिमुर्ती पब्लीक स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकते तर चेतन बुलडाण्यातील राजीव गांधी मिल्ट्रीस्कूलमध्ये आठव्या वर्गात असून श्रेया ही शेगाव येथे सहाव्या वर्गात आहे.
या तीनही बच्चे कंपनीचे विश्वच आता रविकांत तुपकर झाले आहे. योगायोगाने दहा जानेवारी रोजी नगर जिल्ह्यात आंदोलनासाठी गेलेल्या तुपकरांची आणि मानसपुत्री असलेल्या वैष्णवीची त्रिमुर्ती पब्लीक स्कूलमध्ये भेट झाली आणि महिन्यानंतर भेटणाऱ्या या ‘बाप-लेकींच्या’ डोळ्यांच्या कडा आपसूकच पाणावल्या. त्यावेळी आक्रमक राजकारण्याच्या संवेदनशील ह्रदयाची कल्पना आली. आणि फेसबुकवर या प्रसंगाचे एक छायाचित्र व काही मजकूर सोलापूर जिल्ह्यातील रणजीत बागल या एका समर्थकाने पोस्ट केला. तेव्हा राजकारण्याचे ह्रदयही इतके संवेदनशील असते याचा परिचय आला. या तीनही दत्तक पाल्यांना तुपकर हे दर महिन्याला भेट देऊन त्यांची ख्याली, खुशाली जानून घेतात. सर्वात मोठी वैष्णवी ही तल्लख असून गणीतामध्ये आऊट ऑफ मार्क ती घेते. सनदी अधिकारी बनण्याचे तीचे स्वप्न आहे. या संदर्भाने तुपकरांशी संपर्क साधला असता ‘आपण आपल काम करत जाव’ ऐवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.