कर्जमाफीच्या गोंधळावर ‘टोल फ्री’ क्रमांकाची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:44 PM2018-06-29T17:44:30+5:302018-06-29T17:47:08+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार शेतकऱ्यांना ८५१ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप तांत्रिक तथा ‘मिसमॅच’ मुळे लाभ मिळालेला नाही. अशांना आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्यात येणार आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार शेतकऱ्यांना ८५१ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप तांत्रिक तथा ‘मिसमॅच’ मुळे लाभ मिळालेला नाही. अशांना आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबधक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयात थेट नियुक्तीच करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे एकमेव बुलडाणा जिल्ह्यात हा प्रयोग जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पुढाकार घेऊन सुरू केला आहे. २९ जून रोजी त्यानुंषंगाने एक तक्रारही जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती विभागात बसलेल्या अधिकाºयाला मिळाली आहे. गेल्या २५ जून रोजी पीक कर्ज आणि शेतकरी कर्ज माफीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक बोलावली होती. त्यात प्रकर्षाने हा मुद्दा मांडण्यात आल्यानंतर लगोलग त्याची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला गेला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती विभागात असलेल्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर शेतकºयांना कर्जमाफी, पीक कर्ज प्रकरणी अडचणी, तक्रारी, बँकेकडून अडचण सोडविली जात नसल्यास थेट तक्रार नोंदविता येणार आहे. ही तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर तिच्या निराकरणासाठी जिल्हा उपनिबंधक आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांच्या मार्फत थेट पाठपुरावा केला जाईल. त्यानुषंगाने बुलडाण्यात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
२३,४४६ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप
जिल्ह्यातील २३ हजार ४४६ शेतकऱ्यांना आतापर्यंत पीककर्ज वाटप करण्यात आले, असून कर्जवाटपाचा आकडा आता १७७ कोटी ९३ लाखावर पोहोचला आहे. प्रामुख्याने कर्जमाफी मिळालेल्या जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार शेतकऱ्यांपैकीच बहुतांश शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.