रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने ग्रामीण रुग्णालय उभारले. लोणार शहरातील लोणी रोडवर सुसज्ज अशी ग्रामीण रुग्णालयाची उमारत आहे. या रुग्णालयाला जवळपास ५० खेडी जोडलेली आहेत. रुग्ण रात्री, अपरात्री उपचारासाठी येथे दररोज येत असतात; परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्यास येथे मोठ्या अडचणी निर्माण होतात. मागील एक वर्षापासून लाइनची पर्यायी व्यवस्थाच येथे नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दोन लाख रुपये खर्च करून जनरेटर खरेदी केले; पण तेही बंद अवस्थेत आहे. यामुळे रुग्णांना तासन्तास उपचारासाठी ताटकळत बसावे लागते. भरउन्हात पाणी पिण्याची व्यवस्था नाही. येथे कार्यरत वैद्यकीय अधीक्षकांचा मोबाइल नेहमीच बंद येतो.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, आरोग्य विभागाचे एकूणच परिस्थिती पाहता ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्था पुरती कोलमडली आहे. रात्री वीज गेल्यास रुग्णांना नाइलाजास्तव खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. रुग्णांची होणारी गैरसोय व हेळसांड थांबविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.