बुलडाणा जिल्ह्यात ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:32 PM2019-07-02T12:32:34+5:302019-07-02T12:32:46+5:30
बुलडाणा जिल्ह्यात ५५ हजार ६८६ हेक्टर टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवार व सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे. ५५ हजार ६८६ हेक्टर टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात मृग नक्षत्र पुर्णत: कोरडा गेल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खत, बियाणे खरेदीची घाई केली नाही. दरम्यान, मृग आणि आद्रा नक्षत्राच्या जोडावर २३ जून रोजी जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. आद्रा नक्षत्र लागल्यापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने खरिपाच्या लांबणीवर पडलेल्या पेरणीला सुरूवात झाली. २७ जूनपर्यंत खरिपाच्या एकुण नियोजीत ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ सात टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. दरम्यान, रविवारी व सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात एकूण ५५ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात सरासरी ७५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जळगाव जामोद तालुक्यात ४१ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी २ हजार २५०, संग्रामपूर तालुक्यात ४५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी १ हजार १८५, चिखली तालुक्यात ७३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ७००, देऊळगाव राजा तालुक्यात ४५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ९ हजार, मेहकर तालुक्यात ८७ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ५००, सिंदखेड राजा तालुक्यात ६५ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ हजार, लोणार तालुक्यात ५९ हजार ९०० हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ३००, खामगाव तालुक्यात ६६ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ८ हजार, शेगाव तालुक्यात ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ६२९, मलकापूर तालुक्यात ४२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ६४३, मोताळा तालुक्यात ५० हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ८७१, नांदुरा तालुक्यात ४८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पाऊस थांबल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
१५ टक्के सोयाबीन पेरणी
जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख १५ हजार ३५ हेक्टर आहे. यावर्षी ४ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. नियोजीत क्षेत्रापैकी जिल्ह्यात १५ टक्के म्हणजे ३१ हजार २४३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.