लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जून महिन्याच्या मध्यावरही जिल्ह्यात अपेक्षित असा दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पेरण्या रखडलेल्या आहेत. जिल्ह्यात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर या वर्षी पेरणीचे नियोजन आहे. ्यापैकी वर्तमान स्थितीत १७ हजार ४४३ हेक्टवर पेरणी झाली आहे. अल्प प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या, तरी पेरणीयोग्य पाऊस अद्याप जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे अवघ्या २.५० टक्केच पेरण्या जिल्ह्यात झाल्या आहेत.बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत जून महिन्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९ टक्केच (६७.४ मिमी) पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी १६ जूनपर्यंत जिल्ह्यात १६ टक्के (११९.४ मिमी) पाऊस पडला होता. त्यामुळे पेरण्या होण्यास पूरक वातावरण झाले होते. तशी स्थिती वर्तमान स्थितीत जिल्ह्यात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यातल्या त्यात मेहकर, चिखली, खामगाव आणि संग्रामपूर या तालुक्यात तुलनेने पाऊस चांगला पडला आहे. परिणामी, या भागात काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. दुसरीकडे १६ जून रोजी बुलडाणा शहरासह चिखली शहर परिसरातही तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र हा पाऊस पेरणी होईल अशा दृष्टीने पुरेसा नाही. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही संततधार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नजरा आभाळाकडे आहेत.
२० व २१ जूनला पावसाची शक्यताजिल्ह्यात १९ ते १९ जूनच्या दरम्यान जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, २० ते २१ जूनच्या दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली असल्याचे कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी हवामानाचा सुधारीत अंदाज स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.