दुधा ब्रम्हपुरी येथील शेतकरी पंकज पंढरी लोढे व बिबी येथील शेतकरी तेजराव बनकर यांनी विक्रीसाठी आणलेला नवीन सोयाबीन मालाचा खरेदी शुभारंभ ९ सप्टेंबर रोजी हरतालिकाच्या मुहूर्तावर राजू इंगळे यांच्या हस्ते काटा पूजन करून करण्यात आला. दोन्ही शेतकऱ्यांना ९ हजार ९९९ प्रति क्विंटल भाव देण्यात आला. यावेळी शेतकरी पंकज पंढरी लोढे आणि तेजराव बनकर यांचा राजू इंगळे व खरेदीदार विनोद जाधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ४० ते ४५ क्विंटल माल खरेदी करण्यात आला. यावेळी अडते विनाेद जाधव, मकराम बनकर, बबनराव बनकर, तंटामुक्ती अध्यक्ष समाधान पाटील, व्यापारी संजय तिडके, अमजद पठाण यांच्यासह अडते, व्यापारी, हमाल, मापारी व कास्तकार आदी मान्यवर उपस्थित होते.
सोयाबीनला फूल, पापड्या, दाणे भरण्याच्या वेळेस पावसाने हुलकावणी दिल्यामुळे फूलगळ झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे; परंतु भावात अशा पद्धतीची तेजी कायम राहिल्यास उत्पादनात झालेली घट भरून निघू शकते.
-तेजराव बनकर, शेतकरी.