ढोरपगाव: यावर्षी गत महिन्यात झालेल्या अति पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील सोयाबीन सडले. त्यामुळे मातीतून सोने उगविण्याऐवजी शेतीचे पडीक जमिनीत रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यातूनच ढोरपगाव येथील एका शेतकºयाला नाईलाजाने तीन एकर शेतात मेंढरं चारावे लागल्याची परिस्थिती आहे.सततच्या पावसाने गत महिन्यात थैमान घातले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरूच होता. यामुळे ऐन कापणीला आलेल्या सोयाबीनची माती झाली. ढोरपगाव येथील शेतकरी श्रीकांत अविनाश तांगडे यांच्या तीन एकरातील सोयाबीनचेही असेच हाल झाले. यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने मातीतून सोने उगवेल, अशी आशा असतानाच, उभ्या सोयाबीनचं मातेर झालं आहे. काही शेतकºयांच्या शेतातून सोयाबीनची काढणी झाली, मात्र पावसामुळे कुजलेले सोयाबीन कुणीही विकत घ्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट आले आहे. ऐन कापणीच्या काळातच पावसाने कहर केल्याने ढोरपगाव परिसरातील शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. ज्वारी, कापूस उत्पादक शेतकºयांचीही हीच अवस्था आहे. मालाची प्रतवारी प्रचंड घसरल्याने व्यापारी अगदी अत्यल्प भावाने शेतामाल खरेदी करून घेत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीकरीता आणणेही शेतकºयांना परवडेनासे झाले आहे. दरम्यान एवढ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना, केवळ हेक्टरी ८ हजार रूपये एवढी मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरल्या गेल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
रब्बीच्या हंगामाची सोय नाही!खरीपाचा हंगाम हातून गेल्याने निदान रब्बीचा हंगाम तरी चांगला जाण्याची चिन्हे आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने हरभरा पेरणीचे शेतकºयांचे नियोजन होते, परंतु खरीपाची पिके हातून गेल्याने शेतकºयांकडे रब्बीच्या हंगामासाठी पैसा नसल्याचे दिसून येते.