बुलडाणा : बुलडाणा अर्बन को. आॅप क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा, ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स व रनबडीज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २ फेब्रुवारी रोजी आयोजित ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पुणे, मुंबई, हैद्राबाद, औरंगाबाद, जळगाव खांदेश, मध्यप्रदेशमधील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेनिमित्त बुलडाणा-खामगाव मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, संस्थेच्या अध्यक्षा कोमल झंवर, चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, पुणे येथील रनबडीज संस्थेचे संचालक निखिल शहा, कॉ. नितीन चौधरी, अॅड. शरद राखोंडे, अनंता देशपांडे, सचिन वैद्य यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. बोथा जंगलातील निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जवळपास दीड हजार स्पर्धक सहभागी झाले. बुलडाण्या पहिल्यांदाच फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संजय गायकवाड यांनी स्पर्धकांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स केला. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, योगेंद्र गोडे यांच्यासह शहरातील डॉक्टर, प्राध्यापक, वकील, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह युवक, युवतींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. जळगाव खांदेश येथून लहान मुलांची टीम स्पर्धेत सहभागी झाली. स्पर्धकांसाठी आयोजन समितीकडून फळ व फराळाचे वाटप करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी सोय करण्यात आली होती. सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांच्या ब्रॉस बँड पथकाने कार्यक्रमाला सुरुवात करुन उत्साहाचे वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांनी चेहºयावर वेगवेगळ्या प्राण्यांचे मेकअप करुन खेळाडूंचा उत्साह वाढविला.
अशी झाली स्पर्धा
बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धा ३, ५, १० व २१ किलोमिटर अशा चार टप्प्यात घेण्यात आली. पुरुष व महिला खेळाडूंचे ४० वर्षाच्या आतील व ४० वर्षाच्या वरील असे गट पाडण्यात आले होते. बोथा अभयारण्यातील स्वच्छता राखण्यासाठी काळजी घेण्यात आली. आरोग्य विभागाच्या पथकाने 'व्यसन सोडा, निसर्गाशी नाते जोडा' असा सेल्फी पॉर्इंट उभारला होता
असे आहेत विजेते
२१ किलोमिटर मॅरेथॉन ( ४० वर्षा आतील) स्पर्धेत प्रथम किशोर गव्हाणे, द्वितीय छगन बोंबळे तर तृतीय क्रमांक नीलेश सोळंके यांनी पटकावला. २१ किलोमिटर ( ४० वर्षा वरील) मॅरेथॉनमध्ये प्रथम संतोष वाघ, द्वितीय गणेश राठोड, तृतीय अजय सिंघल तर महिला गटात प्रथम ज्योती गवते, द्वितीय अश्विनी काटोले व तृतीय क्रमांक दीपाली तुपे यांनी पटकावला. महिला सिनिअर गटात विठाबाई कचरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. १० किलोमिटर मॅरेथॉनमध्ये ( ४० वर्षा आतील) प्रथम क्रमांक किरण म्हात्रे, द्वितीय वृषभ तिवस्कार व तृतीय क्रमांक भगतसिंग वळवी यांनी पटकावला. तर सिनिअर गटात प्रथम मधुकर सावळेराम, द्वितीय भीमा शिंदे व तृतीय क्रमांक दत्तकूमार गोवर्धन यांनी पटकावला. १० किलोमिटर मॅरेथॉनमध्ये ( ४० वर्षा आतील) महिला गटात प्रथम गितांजली राऊत, द्वितीय कोमल गजके व तृतीय क्रमांक रुपाली दुधभाते हिने मिळविला. सिनिअर गटात प्रथम माधुरी निमजे, द्वितीय सुनीती अंबेरकर व तृतीय क्रमांक कलावती पवार यांनी मिळविला. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या खेळाडूंना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर सहभागी खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.