राज्यात युती; जिल्ह्यात गोंधळ!
By admin | Published: October 29, 2016 02:54 AM2016-10-29T02:54:19+5:302016-10-29T02:54:19+5:30
भाजपाच्या मुलाखती पूर्ण; शिवसेनेकडे उमेदवारांची यादी तयार
अकोला, दि. २८- नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदर भाजपा-सेनेने राज्य स्तरावर युतीची घोषणा केली. या घोषणेमुळे स्थानिक स्तरावरील निवडणुकीचे समीकरणे बदलली असल्याने कार्यकर्त्यांंमध्ये कमालीचा गोंधळ उडाला आहे. एकीकडे स्वबळाची तयारी करीत उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना निवडणुकीसाठी तयार केले असतानाच, ऐन मैदानात उतरविण्यापूर्वीच तडजोडीचे धोरण आल्याने येणार्या निवडणुकीत बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्या उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पक्षाच्यावतीने २५ ऑक्टोबर रोजी पार पाडण्यात आली. पाच नगरपालिकांच्या ११३ सदस्य व पाच नगराध्यक्षपदांसाठी भाजपकडे तब्बल ७३२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले. कोअर कमिटीचे सदस्य पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे व जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी दिवसभर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सारे सोपस्कार पार पाडून अंतिम यादी पक्षङ्म्रेष्ठींकडे मंजुरातीसाठी पाठविण्यात आल्यानंतर आता युतीची घोषणा झाल्याने कोणत्या जागा सेनेसाठी सोडाव्या लागतील, याची गणिते मांडली जात आहेत. शिवसेनेचीही हीच स्थिती आहे. सेनेने स्वबळाची तयारी करीत जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी सर्व जिल्हा पिंजून काढत सेनेमध्ये नवी ऊर्जा भरली.सेनेचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत, सहसंपर्क प्रमुख ङ्म्रीरंगदादा पिंजरकर यांच्याशी चर्चा करीत उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली असून, ती यादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविली आहे. या सर्व पृष्ठभूमीवर आता युतीची घोषणा झाल्याने स्थानिक समीकरणांमध्ये प्रचंड उलथापालथ आहे.
बाळापूर नगरपालिकेत भाजपा-सेना युती ही प्रभाग क्रमांक १ व १0 मधील जागा वाटपाच्या मुद्यावरून याआधीच फिस्कटली आहे. येथे परिवर्तन पॅनलचा बोलबाला असून, त्यामध्ये सर्वच पक्षांच्या नेत्यांचा भरणा आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपा, काँग्रेस, एमआयएम व भारिप यांची लढत परिवर्तन पॅनलसोबत होत असून, या पॅनलला शिवसेना मदत करण्याची शक्यता आहे. तेल्हारा पालिकेत भाजपाची शेतकरी पॅनलसोबत युती आहे, तर सेना स्वबळावर लढतीची तयारी करीत आहे. शेतकरी पॅनलमध्ये भाजपाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली असल्याने येथेही युतीचे भवितव्य धूसर आहे. अकोट नगरपालिकेत मागील परंपरेचा दाखला देत युतीची गणिते विस्कटली आहेत. मागील काळात सेनेचे आमदार होते तर नगराध्यक्षपदही सेनेकडे होते. आता भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदही भाजपाकडे असावे, असा विचार मांडला गेला व त्याच मुद्यावरून युतीचे बिनसले. येथे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सेनेचे सारे दिग्गज नेते हजर होते. तर भाजपाकडूनही पुरुषोत्तम चोखंडे व संतोष झुनझुनवाला यांच्यामध्ये चुरस असल्याने येथेही युतीची शक्यता कमीच दिसते.
मूर्तिजापूर नगरपालिकेसाठी सेनेच्या संगीता गुल्हाने यांचे नाव अध्यक्षपदासाठी पक्के मानले जात आहे. त्यामुळे भाजपासोबत तडजोड करण्याची संधीच राहिलेली नाही. पातूरमध्येही भाजपाने स्वबळाची तयारी पूर्ण केली असून, शिवसनेने सुद्धा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत युतीचे भविष्य अंधारातच आहे.
या सर्व घडामोडी पाहता राज्यातील युतीची घोषणा जिल्ह्यात तरी प्रत्यक्षात येऊ शकत नसल्याचेच गोंधळ व संभ्रमाचेच चित्र आहे.
उमेदवारी अर्ज ऑफलाइन भरा!
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची उमेदवारी अर्ज व शपथपत्रे ऑनलाइन स्वरुपात स्वीकारण्याचे घोषित केले होते. मात्र आता उमेदवारी अर्ज व शपथपत्रे पारंपारिक पध्दतीने म्हणजेच ऑफलाइन स्वरुपात स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. मात्र या सर्व नामनिर्देशन व शपथपत्रातील तपशील संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी यांनी त्याच दिवशी संगणक प्रणालीमध्ये भरणे आवश्यक राहणार आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी २0९ अर्ज दाखल
जिल्ह्यात पाच नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी पाचही नगरपालिकांमध्ये २0९ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे. नगराध्यक्षपदासाठी पातुरात पाचव्या दिवसांपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. तर इतर चार नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी १५ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहेत.आकोटात नगरसेवक पदासाठी ७७ नामांकने, मूर्तिजापूर ६२, बाळापूर २२, पातूर ४ तर तेल्हार्यात ४४ अर्ज दाखल झाले आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोबर ही मुदत आहे. त्यामुळे, शनिवारी नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.