बुलडाणा: कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक जण आपआपल्या परीने प्रयत्न करत असून काहीं व्यक्तींमधील शोधक वृत्ती नवीन काही बनविण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच पद्धतीने अवघ्या १५ हजार रुपयामध्ये बुलडाण्यातील बीई सीव्हील इंजिनियर असलेल्या उमेश शर्मा या युवकाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीरण यंत्र बनवले आहे. बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी त्यासाठी या युवकाला आर्थिक सहाय्य केले आहे. दरम्यान, प्रायोगिक तत्वावरील हे यंत्र सध्या बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे. त्याचे प्रात्याशिक्षक हे जयस्तंभ चौकात सायंकाळ दरम्यान, प्रशासकीय अधिकाºयांना दाखविण्यात आले. प्रामुख्याने इटली, चीनसह अन्य काही देशात अशा पद्धतीने निर्जंतुकीकरण यंत्र बनवून त्याचा वापर करण्यात आला असल्याचेही आ. संजय गायकवाड यांनी सांगितले. सध्या पोलिस, आरोग्य, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य तपासणी तथा तत्सम कामे करीत आहे. हायरिस्क झोनमधून परतल्यानंतर त्यांना निर्जंतुक करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरू शकणारे आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तांत्रिक माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
असे आहे यंत्र
फॅब्रीकेशनचा व्यवसाय असलेल्या शर्मा यांनी छोटा फायबरचे वेष्ठण असलेली छोटेखानी कॅबीन बनवली असून त्यावर ५०० लिटरची पाण्याची टाकी व एक छोटा कृषीपंप व स्प्रींकलरचे नोझल एका नळीच्या सहाय्याने या छोट्या कॅबीनमध्ये लावले आहे. सोबतच ५०० लिटर पाण्यामध्ये पाच लिटर सोडियम हायफोक्लोराईड व अन्य द्रावण टाकून या केबीनमधून ३० ते ३५ सेकंद गेल्यास स्प्रींकलमधील पाणी व या द्रावणाचे तुषार हे संबंधीत व्यक्तीच्या अंगावर पडतात व त्याच्या शरीरावरील सुक्ष्म किटाणू तथा विषाणू नष्ट होण्यास मदत मिळते, अशी ही साधी सोपी संकल्पना आहे.
आ. संजय गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून या पद्धीच्या मुव्हेबल निर्जंतुकीकरण कॅबीन बनविण्याचा आमचा मानस आहे. प्रशासनाने सहकार्य व अनुमती दिल्यास त्यांना आम्ही त्या पुरवू शकतो. यासाठी खर्चही अत्यल्प येतो.
- उमेश शर्मा, बीई, सिव्हील इंजिनियर, बुलडाणा