- सुधीर चेके पाटीललोकमत न्यूज नेटवर्कचिखली : लॉकडाउनमुळे तळहातावर पोट असलेल्यांची चूलच पेटत नसल्याने जगायच कसं असा प्रश्न निर्माण होत असताना; प्रशासनाने वेळीच दखल घेतली. ग्रामीण भागातील मजूरांसाठी रोहयोची कामे सुरू केल्याने तालुक्यातील ३१२ मजुरांना दिलासा मिळाला आहे.लॉकडाउनमुळे सुरूवातीच्या टप्प्यात सर्वच व्यवहार बंद असल्याने दिवसभर मोलमजुरी केल्याशिवाय चूल पेटणार नाही, अशा अवस्थेतील मजुरांवर उपासमार ओढावली होती. तालुक्यातील अनेक मजुरांनी काम उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानुसार रोहयोअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचे प्रस्ताव तयार करून संबंधित ग्रामपंचायतीने पंचायत समिती प्रशासनाला अहवाल सादर केला. मजुरांच्या कामाच्या मागणीचा विचार लक्षात घेत पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यातील ३५ गावांत सामाजिक वनीकरणाच्या नर्सरी, ग्रा. प. वृक्षलागवड, ग्रामीण भागातील स्मशानभूमीचे सुशोभिकरण, सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर, विहीर पुनर्भरण, शौचालय शोषखड्डा, घरकूल आदी सुमारे ७७ कामांना सुरूवात केली. या माध्यमातून ३१२ मजुरांच्या हाताला काम मिळाले. कोरोनामुळे यंदा परिसरातील अनेक लहान-मोठे उद्योग धंदे बंद असल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मात्र, रोहयोमुळे हे संकट दूर झाले. कामांवरील मजुरांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काम करताना मजुरांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे आदी खबरदारी बाळगण्याच्या सूचना देखील प्रशासनाव्दारे देण्यात आल्या आहेत.
चिखली तालुक्यातील मजुरांची संख्याचिखली तालुक्यात एकूण मजुरांची संख्या मोठी असली तरी प्रशासनाकडे रितसर नोंदणी करून व सक्रीय जॉब कार्डधारक मजूरांची संख्या १० हजार २६८ आहे. यातील ३१२ मजुरांना सध्या रोजगार उपलब्ध झालेला आहे.
३५ गावात रोहयोच्या कामाला सुरूवात करण्यात आली. शेततळ्यांची कामे केली जाणार असल्याने ज्या मजुरांना कामाची आवश्यकता आहे, अशा मजुरांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी करावी. मागणी केलेल्या प्रत्येक मजुराला काम आणि त्या बदल्यात योग्य दाम दिला जाईल.- एस.जी.कांबळे, प्रभारी गटविकास अधिकारी, चिखली