दुष्काळाविरुद्ध गावक-यांचा संघर्ष प्रेरणादायी-सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:52 AM2018-04-09T01:52:44+5:302018-04-09T01:52:44+5:30
धामणगाव बढे : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून झपाटल्यागत काम करणा-या, गाव पाणीदार करण्याचा संकल्प करणा-या व एकजुटीने दुष्काळाशी पंगा घेणा-या सिंदखेडवासीयांचा संघर्ष प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
नवीन मोदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे(बुलडाणा) : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून झपाटल्यागत काम करणा-या, गाव पाणीदार करण्याचा संकल्प करणा-या व एकजुटीने दुष्काळाशी पंगा घेणा-या सिंदखेडवासीयांचा संघर्ष प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
७ एप्रिलच्या रात्री १२ वाजेला सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा संपूर्ण राज्यात प्रारंभ झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व श्रमदानासाठी आ. हर्षवर्धन सपकाळ सिंदखेड येथे आले होते. रात्री १२ वाजता सिंदखेड येथील सुमारे ४०० महिला, पुरुष, अबाल, वृद्ध श्रमदानासाठी एकवटले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जि.प. सदस्य अॅड. गणेशसिंग राजपूत, प्रवीण कदम प्रामुख्याने उपस्थित होते. गावक-यांच्या जिद्दीने व भीतीने दुष्काळ वेशीवर आला. पुढील ४५ दिवसात त्याला हद्दपार व्हावे लागेल, असे यावेळी उपजिल्हाधिकारी व-हाडे यांनी सांगितले. ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे.
सिने अभिनेते आमिर खान यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे. याचे सकारात्मक परिणाम मागील दोन वर्षात दिसत आहे, तर यावर्षी राज्यातील ४ हजार खेडी यामध्ये सहभागी झाली आहेत.
सिंदखेडवासीयांनी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, आगपेटी मुक्त शिवार, माती परीक्षण नर्सरी, पाणीबचत तंत्रज्ञान, शोषखड्डे यासारखी पूर्वतयारी याअगोदरच पूर्ण केली. विशेषत: या उपक्रमास महिलांचा सहभाग लक्षणीय असून, नुकतीच महिलांनी जनजागृतीसाठी मशाल रॅली काढली होती.
सिंदखेड येथे ७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता औपचारिक उद्घाटनानंतर प्रत्यक्ष श्रमदानास गावक-यांनी प्रारंभ केला. दुष्काळाला हद्दपार करून गाव पाणीदार करण्याचा संकल्प गावकºयांनी केला आहे. त्यासाठी गावकरी, पाणी फाउंडेशन, जिल्हा प्रशासन एकवटले आहे.
प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात काटेकोर नियोजन, युवकांचा प्रचंड प्रतिसाद, गावाची एकजुटता आणि प्रशासनासाठी साथ यामुळे सिंदखेडमध्ये ‘तुफान आलया’ आणि परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन, पाणी फाउंडेशन कामावर लक्ष ठेवून आहे, तर ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर गावात तळ ठोकून आहे. सिंदखेड येथे श्रमदानासाठी बाहेर गावावरून येणा-यांसाठी जेवणाची व्यवस्था, श्रमदानासाठी साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे.